लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत काॅंग्रेसने राष्ट्रवादीला दे धक्का करीत भाजपचा एक गट फाेडत बहुमताचा जादुई २७ चा आकडा प्राप्त केला. अध्यक्षपदी काेंढा गटाचे गंगाधर जिभकाटे यांची तर उपाध्यक्षपदी भाजप बंडखाेर संदीप ताले यांची निवड झाली. नाट्यमय घडामाेडीने तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर मंगळवारी संपुष्टात आला.जिल्हा परिषदेत कुण्या एका पक्षाला बहूमत नव्हते. २१ जागा जिंकत काॅंग्रेस सर्वात माेठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना १, बसपा १, अपक्ष ४ असे संख्याबळ आहे. नैसर्गिक मित्र आणि महाविकास आघाडी एकत्र असलेले काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापन करेल अशी अपेक्षा हाेती. मात्र राजकीय उलथापालथ हाेत गेली. पंचायत समिती सभापती निवडीवरुन काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीत दुरावा निर्माण झाला. त्याचे परिणाम जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत मंगळवारी दिसून आले.काॅंग्रेसने भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाशी हातमिळवणी केली. भाजपचे पाच आणि एक अपक्ष अशा सदस्यांच्या मदतीने जिल्हा परिषदेतील बहुमताचा २७ हा जादूई आकडा पार केला. तर भाजप बंडखाेर गटाच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ घातली.जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी सकाळी ११ वाजतापासून निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. अध्यक्ष पदासाठी पवनी तालुकयातील काेंढा गटाचे गंगाधर मुकुंदराव जिभकाटे यांचे नामांकन दाखल झाले तर राष्ट्रवादीतर्फे लाखांदूर तालुक्यातील दिघाेरी गटाचे सदस्य अविनाश आनंदराव ब्राम्हणकर यांनी नामांकन दाखल केले. उपाध्यक्ष पदासाठी भाजप बंडखाेर गटाचे संदीप साेमाजी ताले यांच्यासह भाजपच्या माहेश्वरी हेमराज नेवारे, प्रियंका माेरेश्वर बाेरकर यांनी नामांकन दाखल केले. मात्र माहेश्वरी नेवारे यांनी नामांकन मागे घेतले. त्यानंतर दुपारी २.३० वाजता पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या उपस्थितीत निवडणुकीला प्रारंभ झाला. अध्यक्ष पदासाठी जिभकाटे यांना २७ सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. तर ब्राम्हणकर यांना २५ सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. त्यावरुन गंगाधर जिभकाटे अध्यक्षपदी निवडून आले. उपाध्यक्ष पदाच्या निवडीत संदीप ताले यांना २७ तर प्रियंक बाेरकर यांना २५ सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. यात संदीप ताले उपाध्यक्षपदी निवडल्या गेले. निवडीच्यावेळी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी प्रदीप चाैधरी, उपमुख्य कार्याकार अधिकारी डाॅ. सचिन पानझाडे उपस्थित हाेते. जिल्हा परिषदेला सकाळपासूनच छावणीचे रुप आले हाेते. पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. माेठ्या प्रमाणात नागरिक गाेळा झाले हाेते.
असे घडले राजकीय नाट्य
काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाही हे साेमवारी जवळजवळ निश्चित झाले हाेते. काॅंग्रेसने थेट भाजपाच्या आमदार चरण वाघमारे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या गटाचे पाच सदस्य काॅंग्रेससाेबत येण्यास तयार झाले. मात्र ही बाब भाजपच्या वरिष्ठांना माहित हाेताच त्यांनी साेमवारी रात्रीपासूनच चरण वाघमारे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटपर्यंत त्यात यश आले नाही. इकडे राष्ट्रवादीनेही जाेरदार तयारी केली हाेती. भाजपमधील बंडखाेरी संपुष्टात येवून अपक्षांच्या मदतीने आपण २७ हा आकडा गाठू अशी खात्री हाेती. परंतु भाजप बंडखाेरांनी कुणाचीही न ऐकता थेट काॅंग्रेसच्या पारड्यात आपले मत टाकले.
काॅंग्रेसला संपविण्याचा डाव राष्ट्रवादीने पंचायत समिती सभापती निवडणुकीत साधला. त्यामुळे काॅंग्रेसने जशासतसे उत्तर दिले. काेराेनाकाळात जिल्ह्याचा विकास रखडला. ताे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरुन काढू. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटाेले यांच्या नेतृत्वात विकासाला गती दिली जाईल.- गंगाधर जिभकाटे, नवनिर्वाचित अध्यक्ष
आम्ही भाजपचेच आहाेत. परंतु भाजपच्या काहींनी राष्ट्रवादीसाेबत जवळीक करुन दगा देण्याचा प्रयत्न केला. ताे आज हाणून पाडण्यात आला. माजी आमदार चरण वाघमारे यांचे नेतृत्व आमच्या पाठीशी आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी मिळालेला हा काैल आहे. यातून जिल्ह्याचा निश्चितच विकास हाेईल.- संदीप ताले,नवनिर्वाचित उपाध्यक्ष
राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला - नाना पटाेले- जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काॅंग्रेससाेबतची दाेस्ती ताेडली. त्यांनी काॅंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला. आता नवीन दाेस्त विकास फाऊंडेशनच्या मदतीने आम्ही सत्ता स्थापन केली. गाेंदियात बहूमत असताना राष्ट्रवादीला उपाध्यक्ष दिले. तेथे भाजपची राष्ट्रवादीसाेबत युती झाली. या बाबीची वरिष्ठ स्तरावर चर्चा करणार आहे. वेळीच साेक्षमाेक्ष लावला पाहिजे असे काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी सांगितले. तसेच माजी आमदार चरण वाघमारे यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करावा असेही त्यांनी सांगितले.
सभागृहात धक्काबुक्की- कडेकाेट बंदाेबस्तात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची सभा सुरु झाली. मात्र या सभेत चांगलीच धक्काबुक्की झाली. भाजपच्या सदस्यांना व्हिप देण्यासाठी गेलेले प्रियंक बाेरकर, गणेश निरगुडे आणि विनाेद बांते यांना काॅंग्रेस आणि भाजपच्या बंडखाेरांनी धक्काबुक्की केली. तर महिला सदस्य माहेश्वरी नेवारे यांना धक्का लागून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटले. घडलेला हा प्रकार निंदनिय असल्याचे म्हणत भाजपने या घटनेचा निषेध केला. तसेच भाजपचे कार्यकर्ते या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी पाेलीस ठाण्यात पाेहाेचले हाेते
विधानपरिषदेच्या आमदारांनी आम्हाला डावलून जी खेळी खेळली ती त्यांच्याच अंगलट आली. राष्ट्रवादीशी आम्ही कधीही जवळीकता साधली नव्हती. त्यामुळेच काॅंग्रेसच्या साेबतीने सत्ता साधली. विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्याचा विकास करु.- चरण वाघमारे, माजी आमदार तुमसर
राष्ट्रवादीने चर्चेची दारे खुली ठेवली हाेती. परंतु काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष व नेत्यांनी चर्चा करण्याऐवजी भाजपच्या दुसऱ्या गटाशी बाेलणे सुरु ठेवून दगाबाजी केली. त्यामुळेच आम्हाला गाेंदियात भाजपसाेबत जावून सत्ता स्थापन करावी लागली.- राजेंद्र जैन, माजी आमदार