काँग्रेस-शिवसेनेत १० जागांवरुन भांडणं, तर...; प्रकाश आंबेडकरांनी सांगितली 'अंदर की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 10:07 AM2024-03-05T10:07:25+5:302024-03-05T10:10:03+5:30
भंडारा येथील पहिल्याच सभेत आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावर थेट भाष्य केलं.
भंडारा/मुंबई - लोकसभा निवडणूकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना भाजपाने १९५ जागांवर उमेदवारांची घोषणाही केली. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीचं जागावाटपच अद्याप झालेलं नाही. त्यात, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यावरुन जागावाटप निश्चित होत नाही. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या जागांची मागणी महाविकास आघाडीला अद्याप तरी मान्य नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेच, अजूनही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येईल की नाही, यावर प्रश्नचिन्हच आहे. त्यातच, प्रकाश आंबेडकरांनी जाहीर संभांना सुरुवात केली. भंडारा येथील पहिल्याच सभेत आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावर थेट भाष्य केलं.
बहुजन सारे एक होऊया, सत्ता आपल्या हाती घेऊया... अशा बॅनरखाली भंडारा येथे बहुजन अधिकार महासभेतील जाहीर सभेतून प्रकाश आंबेडकरांनी भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकावर हल्लाबोल केला. तसेच, महाविकास आघाडीतील वंचितच्या सहभागावरही भाष्य केलं. काँग्रेस शिवसेनेत १० जागांवरुन भांडणं सुरू आहेत. तर, काँग्रेस आणि एनसीपी यांच्यात ५ जागांवरुन भांडणं सुरू आहेत. म्हणजेच, ४८ पैकी १५ जागांवरुन महाविकास आघाडीतील पक्षांची भांडणं सुरू आहेत. पण, माध्यमांत वंचित बहुजन आघाडी बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही, हे मी सांगतो. आमच्यासाठी चर्चा कधी सुरू होईल, त्यांची भांडणं संपल्यानंतर. आता, त्यांचीच भांडणं सुरू झाली नाहीत, तर आमच्याशी चर्चा काय होणार आहे, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाची अंदर की बात सांगितली.
१२ ते १६ मार्च दरम्यान आचारसंहिता लागू होईल. आज ४ मार्च, किती दिवस शिल्लक राहिले आहेत. आता, यांचं भांडण मिटलं नाही तर, मग काय. मी अपेक्षा करतो की, ह्यांचं भांडण मिटेल आणि आमच्यासोबत चर्चा सुरू होईल, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
आपल्यात एकच गोष्ट समसमान
हा लढा महत्त्वाचा आहे. मतदानातून हा लढा लढायचा आहे. त्यामुळेच, आम्ही एकत्र येण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत. पण, जर हे शक्य झालं नाही तर निराश व्हायचं नाही, ताकद गळल्यासारखं व्हायचं नाही. त्यांना आपण बरोबर घेत आहोत, काहींना भाजपाने हाकललंय म्हणून ते वेगळे झाले आहेत. काहींना तुरुंगात जाण्याची भीती आहे, म्हणून ते आपल्यासोबत आहेत. त्यांचा अजेंडा त्यांच्याकडे, आपला अजेंडा आपल्याकडे. मात्र, या दोन्ही अजेंड्यातून एकच गोष्ट समसमान आहे, ती म्हणजे त्यांनाही भाजपा आणि आरएसएसचं सरकार नको आहे, आणि आपल्यालाही भाजपा व आरएसएसचं सरकार नको आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.
जितेंद्र आव्हाडांचं पत्र
वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू आहे, ते आमच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये असतील, असे शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी म्हटले. तर, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन पत्र लिहून प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबतच यावे, असा आग्रह केला आहे. संविधान आणि लोकशाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले अमूल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूया ! जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, असे जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरांना उद्देशून म्हटलं आहे.