लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : काँग्रेसने गुरुवारी रात्री ४८ उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली. त्यात अपेक्षेनरुप साकोली विधानसभा मतदार संघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मात्र भंडाराचा या यादीत उल्लेख नाही.
नाना पटोले यांची साकोलीतून उमेदवारी आधीपासूनच पक्की मानली जात होती. जिल्ह्यातील साकोलीसह भंडारा आणि तुमसर या तिनही विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी केली आहे. त्यापैकी साकोली आणि तुमसर या दोन मतदार संघात उमेदवारीची घोषणा झाली असली तरी भंडारा विधानसभा मतदार संघातील उमेदवारीची प्रतीक्षा सर्वांनाच आहे.
भंडारात काय? भंडारा विधानसभेतील काँग्रेसमधील उमेदवारीवरुन बराच अंतर्गत वाद सुरु आहे. येथील उमेदवारी बुध्दीष्ट व्यक्तीलाच द्यावी, अशी जोरदार मागणी पुढे आली आहे. एवढेच नाही तर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उध्दव ठाकरे गटानेही या जागेवर दावा केला असून तयारी चालविली आहे. पहिल्या यादीत भंडाराचा समावेश राहील अशी अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने भंडाऱ्यात उमेदवारीबाबत काय घडणार हा अनेकांचा प्रश्न आहे.