तुमसर : गावातील वीजखांबांचा वीज पुरवठा मागील २० ते २५ दिवसांपासून खंडित असून, कृषिपंपाची ही वीज बंद करण्यात आली होती. ती पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी छावा संग्राम परिषदेतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत कार्यकारी अभियंता अभियंत्यांना दोन्ही वीज जोडणी सुरू करण्याचे निर्देश दिले. तुमसर तालुका छावा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यामुळे ग्रामीण भागात सध्या अंधाराचे साम्राज्य आहे. मागील वीस ते बावीस दिवसांपूर्वी महावितरण कंपनीने विजेच्या थकीत बिलापोटी वीजखांबाची वीज खंडित केली होती. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अंधार पसरलेला आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांमुळे धोक्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचीसुद्धा वीज खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामात सिंचन कसे करावे, असा प्रश्न अनेक शेतकर्यांना पडला आहे. महावितरण कंपनीच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागात असंतोष आहे. याप्रकरणी छावा संग्राम परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करून स्ट्रीट लाईट व कृषिपंपाची वीज जोडणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी छावा संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष आजबले, बालू भाऊ ठवकर, पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे, तालुकाध्यक्ष बालक दास ठवकर, तालुका उपाध्यक्ष प्रफुल वराडे, विजय भाऊ, राजकमल तुमसरे, युवक छावाचे तालुका अध्यक्ष राजेश पेरे, सुधीर गोमासे उपस्थित होते.