पोषण आहार : मंत्र्यांना साकडे, अखिल भारतीय शिक्षक संघटनेची मागणी भंडारा : दररोज किती विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो, याबबातची माहिती आॅनलाईन द्यावी, या आदेशाबाबत फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष देवीदास बसवदे, राज्य सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे तथा ग्रामविकास राज्यमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. २३ जून रोजी मंत्रालयात संघटनेच्या शिर्ष नेत्यांनी मंत्र्यांची भेट घेऊन उपरोक्त मागणी केली. आहे. सर्वशिक्षा अभियानातून दररोज किती विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो, कोणत्या आहाराचा समावेश आहे, याची माहिती संबंधित विभागाला आॅनलाईन पद्धतीने द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहे. ही माहिती दररोज न दिल्यास या दिवशी लाभार्थी गैरहजर समजून अनुदानाला मुकावे लागणार असल्याची शक्यता आहे. शासनाकडून जिल्हा परिषद व अन्य शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात येतो. याबाबतची तंतोतंत माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व शालेय पोषण आहार विभागाने कामे सांभाळणाऱ्यांनी आॅनलाईन पद्धतीने माहिती भरण्यासाठी ‘त्या’ वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शालेय पोषण आहार दिला जाणाऱ्या सर्व शाळांनी सरल वेबसाईटमधील ‘पोर्टल’मध्ये असलेल्या ‘एमडीएम’ या वेबसाईटवर जाऊन उपलब्ध असलेल्या कोष्टकाप्रमाणे रोजच्या रोज वाटप केलेल्या शालेय पोषण आहाराची आणि विद्यार्थी उपस्थितीची माहिती न चुकता भरायची आहे. शाळांना ही माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळेत विद्यार्थी किती उपस्थित आहेत, त्याच्यासाठी दररोज किती पोषण आहार शिजविला जातो आहे. कोणत्या आहार बनविला, याचीही माहिती संबंधित शिक्षक व मुख्याध्यापकांनी त्याच दिवशी आॅनलाईन पद्धतीने भरावयाची आहे. सदर अहवाल विभागाकडे पाठवायचा आहे. यासंदर्भात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष देवीदास बसवदे, राज्य सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे तथा ग्रामविकास राज्यमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी भेट घेतली. राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नाहीॅ परिणामी माहिती अपडेट करायची तरी कशी असा प्रश्न आहे. परिणामी इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत या निर्णयावर फेरविचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत २९ जून रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी पुन्हा बोलाविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)इंटरनेट सुविधा नसल्याने शिक्षकांना बाहेरून माहिती अपडेट करावी लागणार आहे. आधीच कामाचा ताण वाढणार आहे. इंटरनेट सुविधा दिल्यास माहिती अपडेट करायला हरकत नाही. परंतु अद्ययावत सुविधा कार्यान्वित होईपर्यंत पूर्वीप्रमाणे दर महिन्याला माहिती देण्याची मुभा द्यावी.रमेश सिंगनजुडे,जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ भंडारा
‘त्या’ निर्णयावर फेरविचार करा
By admin | Published: June 27, 2016 12:41 AM