भंडारा : भंडारा नगर परिषदेसाठी भुयारी गटार योजना मंजूर करण्यासाठी सातत्याने मी व माझ्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्री व नगरविकासमंत्र्यांच्या सहकार्यानेच भंडारा या योजनेसाठी १६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला; परंतु ही योजना आपल्यामुळे मंजूर झाल्याचे सांगून खासदार तथा नगराध्यक्ष सुनील मेंढे हे विनाकारण नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत, अशी टिप्पणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली. गुरुवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आ. भोंडेकर म्हणाले, भंडारा शहरासाठी भूमिगत गटार योजनेच्या १६७ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यांतर्गत ११६.६० कोटी रुपयांच्या कामाला शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. २०१९ मध्ये निवडून आल्यानंतर एप्रिल २०२० मध्ये विधानसभेतील प्रलंबित प्रकल्पाचा आढावा घेतला. प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी वारंवार सहकऱ्यांसह पाठपुरावा केला. भूमिगत गटार योजना मंजूर होण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे ७० टक्के काम पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, भंडाऱ्यात वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम फक्त २३ टक्के झाले आहे. असे असतानाही आपल्या पाठपुराव्यामुळे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून भूमिगत गटार योजनेला प्रशासकीय मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी तांत्रिक मान्यतेपासून ते प्रशासकीय मान्यतेपर्यंत सर्व प्रक्रियेला आम्ही गती दिली.
सत्तापक्षात असल्याने शहरासाठी निधी खेचून आणला. प्रकल्पासाठी निधी मंजूर झाल्याचे पत्र हातात आल्यानंतर मी स्वत: व खासदार सुनील मेंढे यांच्यासोबत पत्रकार परिषदेतून माहिती देणार होतो; परंतु त्यापूर्वीच खा. मेंढे यांनी हा प्रकल्प आपल्या प्रयत्नामुळे मंजूर झाल्याचे सांगितले. हा फक्त श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याचेही आ. भोंडेकर म्हणाले. केंद्रात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे खा. मेंढे यांनी जिल्ह्यासाठी केंद्राकडून मोठा प्रकल्प मंजूर करवून आणावा, असा सल्लाही त्यांनी दिला. पत्रपरिषदेला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल गायधने, संजय रेहपाडे, जॅकी रावलानी आदी उपस्थित होते.