इंद्रपाल कटकवार
भंडारा : देशाला हादरवून सोडणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडात महिला डॉक्टरचा बळी देण्याचे षडयंत्र रचले जात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अभय देण्याचे षडयंत्र पुढे येत आहे. विशेष नवजात अतिदक्षता कक्षात नियुक्त कंत्राटी डॉक्टरला शुक्रवारच्या रात्री कोविड आयसोलेशन वॉर्डाचीही जबाबदारी देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. यातून एकाच डॉक्टरवर दोन विभागाची जबाबदारी देण्यात आल्याची धक्कादायक बाब निदर्शनास येते. आठवडाभरातील डॉक्टरांच्या ड्यूटीचा चार्टच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ‘बचाव तंत्र’ सुरू झाले आहे. कुणाचा तरी बळी देऊन प्रकरण निस्तारण्याचे घाटत आहे. शुक्रवारच्या रात्री एनएससीयु कक्षात नियुक्त एका कंत्राटी डॉक्टरवर या प्रकरणाचे संपूर्ण खापर फोडून आरोग्य प्रशासन नामानिराळे होण्याच्या तयारीत आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, या डॉक्टरला संपूर्ण प्रकरण अंगावर घेण्यासाठी बाध्य केले जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. घटनेच्या रात्री तुम्ही कक्षात कर्तव्यावर होता, असे लिहून द्या, असे बजावण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘त्या’ रात्री संबंधित डॉक्टरला आयसोलेशन वॉर्डाची जबाबदारी देण्यात आली होती.
ड्युटीचे गौडबंगालडॉक्टरांचा ड्युटी चार्ट तयार होत असला तरी काेणते डॉक्टर्स कुठे काम करणार, याची माहिती नसते. डॉक्टर्स आपसात ‘सेटींग’ करून ड्युटी बदलवून घेतात. हीच अवस्था परिचारिकांच्या ड्युटीचीही आहे. त्यामुळे त्या काळरात्री नेमकी कोणती नर्स तेथे नियुक्त होती, हे कळायला मार्ग नाही.
अशी होती ड्युटीn दर आठवड्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांची विभागनिहाय ड्युटी लावण्यात येते. ४ ते १० जानेवारीपर्यंतच्या तक्त्यानुसार, ८ जानेवारी रोजी विशेष नवजात अतिदक्षता विभागात दोन डॉक्टरांची ड्युटी होती. यातील एक डॉक्टर मानधन तत्त्वावर नियुक्त आहे. n शनिवारीसुद्धा याच डॉक्टरांची नियुक्ती तेथे होती. घटनेच्यावेळी डॉक्टर उपस्थित नसल्याचा मुद्दा पुढे आला आहे. यातील एक डॉक्टर कोविड आयसोलेशन वॉर्डात नियुक्त होते. n एकीकडे कागदोपत्री दोन्ही विभागात काम करणाऱ्या डॉक्टरला या प्रकरणात गोवून त्यांचा बळी घेण्याचा घाट स्थानिक आरोग्य यंत्रणेने घातला.