पंचायत समिती वगळता इतर शासकीय कार्यालये एकाच इमारतीत येणार
तुमसर : नागरिकांच्या वेळेची बचत व होणारा त्रास कमी व्हावा या हेतूने राज्यशासनाने एकाच इमारतीत सर्व कार्यालयाचे नियोजन केले. त्याकरिता तुमसर शहरात १३ कोटींची प्रशासकीय इमारत बांधकामाला सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. परंतु इमारतीचे बांधकाम अतिशय संथगतीने सुरू आहे. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
पंचायत समिती कार्यालय वगळता इतर शासकीय कार्यालय एकाच प्रशासकीय इमारतीत राहावेत याकरिता तहसील कार्यालय परिसरात १३ कोटींच्या प्रशासकीय इमारतीला मंजुरी देण्यात आली. दोन वर्षांपूर्वी सदर इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. परंतु अद्यापही या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नाही तर सदर बांधकाम हे संथगतीने सुरू आहे.
अनेक विभागातील प्रशासकीय कार्यालय भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत त्यामुळे नागरिकांना काम सोडून दुसऱ्या स्थळापर्यंत जावे लागते यात नागरिकांचा वेळ अधिक खर्च होऊन मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागतो. त्यामुळे एकाच इमारतीत सर्व प्रशासकीय कार्यालय सुरू व्हावेत, अशी संकल्पना राज्य शासनाची होती. त्या अनुषंगाने तुमसर येथे १३ कोटींचे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. यामुळे दरवर्षी भाड्यापोटी लाखो रुपयांची शासनाची बचत होईल.
बॉक्स
तहसील कार्यालयाला गळती
मागील दोन वर्षापासून इमारतीचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. बांधकामाची गती वाढवण्याची गरज आहे. तुमसर तहसील कार्यालयाच्या वऱ्हांड्याला गळती लागली आहे. त्यामुळे या इमारतीचे आयुष्य संपल्यात जमा आहे. प्रशासकीय इमारतीचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याची गरज आहे.