डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथे गेल्या वर्षापासून ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेमधून जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्र (दामू) स्थापन झाले आहे. हवामान व त्यातील बदलानुसार शेतकऱ्यांना सर्व घटकांची माहिती व्हावी, याकरिता कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथे स्वयंचलित हवामान यंत्रणेची उभारणी पूर्ण झाली असून आता याद्वारे हवामानाची आकडेवारी संकलित करण्यात येईल. यामध्ये कमाल व किमान तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग व वाऱ्याची दिशा, जमिनीतील ओलावा, जमिनीतील तापमान, सूर्यप्रकाशाचा कालावधी, पर्जन्यमान, या सर्व नोंदी सहजपणे उपलब्ध होणार आहेत. यामुळे भविष्यात हवामानाचा अचूक अंदाज देता येईल, जेणेकरून शेतकऱ्यांना जमिनीच्या मशागतीपासून ते काढणीपर्यंत माहिती मिळण्यास मदत होईल व शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे योग्य नियोजन करता येईल.
कृषी सल्ला पत्रक आठवड्यातून दोनदा तयार करण्यात येते व व्हॉट्सअॅप व एम. किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाते. यामध्ये माती परीक्षण, यांत्रिकीकरण, बीजप्रकिया, खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, पशुपालन व्यवस्थापन, आपत्कालीन पीक व्यवस्थापन तसेच पीकनिहाय माहिती दिली जाते. तसेच पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज व मागील आठवड्यात अनुभवलेले हवामान यावर आधारित कृषी सल्ला पत्रिका तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून तयार करून ती जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत सामाजिक माध्यमांद्वारे पोहोचविण्याचे काम हे केंद्र सतत करत आहे. आठ घटकांची स्वयंचलित पद्धतीने मिळणार माहिती
देशातील १९६ जिल्हे हे हवामान बदलाबाबत संवेदनशील आहेत. यामध्ये भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे. दुसरीकडे राज्यातील दहा जिल्ह्यांतील स्वयंचलित हवामान केंद्र प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित झाली आहे. स्वयंचलित हवामान केंद्राच्या सर्वेक्षणासाठी हवामान विभागाचे पथक पाहणीसाठी येणार आहे. जमिनीतील ओलाव्यापासून ते सूर्यप्रकाशाची प्रखरता अशा आठ घटकांची माहिती व्हॉट्सॲप, मोबाइल टेक्स संदेश, एम किसान पोर्टल तसेच शेतकरी प्रशिक्षणे व प्रक्षेत्र भेटी दरम्यान तसेच कृषी व सलग्न विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. जिल्ह्यातील हवामानाची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळीच हवामानाचा अंदाज व कृषीविषयक सल्ला मिळणार आहे.