करडी (पालोरा) : मोहाडी व भंडारा तालुक्यांतर्गत असलेल्या खडकी ते भिलेवाडा मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खोल खड्डयांमुळे २७ कि.मी. रस्त्याचे बेहाल झाले असताना बांधकाम विभाग शांत आहे. वाहतूकदारांच्या मरणाची वाट पाहत आहे का बांधकाम विभाग, असा प्रश्न वाहनधारक करत आहेत. जागोजागी खोल खड्डे, आडव्या नाल्या, रस्त्याकडेला असलेल्या खोल खाचांमुळे आता जिल्ह्याच्या बांधकाम विभागानेच लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. वाहन चालवायचे कुठून? असा प्रश्न वाहतूकदारांकडून विचारला जात आहे. खडकी ते भिलेवाडा या जिल्हा मार्गाचा खडकी ते ढिवरखाडापर्यंतचा ५ किमीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी यांच्या अधिकार क्षेत्रात मोडतो, तर ढिवरवाडा जंगलापासून भिलेवाडापर्यंतचा २२ किमीचा रस्ता बांधकाम उपविभाग भंडारा यांच्या कार्यकक्षेत मोडतो; परंतु दोन्ही विभागाने जणू धृतराष्ट्रांसारखी भूमिका घेतली आहे. जिल्हयातील लोकप्रिय समजणारे लोकप्रतिनिधीही 'गांधारी’सारखे डोळ्यावर पट्टी बांधून घेत आहेत. रस्त्यामुळे अनेकदा वाहन घसरून अनेकांना दुखापती झाल्या. काहींचे रस्त्यावरच प्राण गेले. मागील पाच वर्षांपासून रस्ता दुरुस्तीच्या नावावर ठेकेदार व अधिकाऱ्यांचे पोट भरण्याचे काम बांधकाम विभागाकडून होत असल्याचा आरोप होत आहे. निधी खेचून आणण्यात लोकसेवक अपयशी ठरत असताना विकासाचा टेंभा मिरविणे आता कमी करा, असे नागरिक म्हणत आहेत. बांधकाम विभागालाही कोणतेही सोयरसूतक नसल्याचे दिसून येत आहे. बांधकाम विभागाने त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी, लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात प्रश्न मांडून निधी खेचून आणावा, अशी मागणी डॉ. पी. सी. डोंगरवार, खडकी येथील बजरंग राईस मिलचे संचालक डुडेश्वर खराबे, नरेश बोंदरे, परिसरातील वाहतूकदारांनी केली आहे.
250921\img_20210921_124608.jpg
खडकी ते भिलेवाडा रस्ता