शासनाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत गत वर्षभरापूर्वी लाखांदूर तालुक्यातील ढोलसर ते पवनी तालुक्यातील आसगाव - शिवनाळा मार्गाचे बांधकाम मंजूर करण्यात आले होते. एकूण ९.४२ किलोमीटर लांबीच्या या मार्गाच्या बांधकामासाठी शासनाच्या योजनेअंतर्गत तब्बल ५७८.९९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र गत काही महिन्यांपासून या योजनेअंतर्गत शासनाद्वारा निधी उपलब्ध न केला गेल्याने दोन तालुक्यांतील गावांना जोडणाऱ्या आंतरमार्गांचे बांधकाम ठप्प पडले आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर ढोलसर - आसगाव - शिवनाळा या ९.४२ किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या बांधकामाअंतर्गत एकूण ६९० मीटर रस्त्याचे बांधकाम सिमेंट काँक्रिटचे केले जाणार आहे, तर उर्वरित ८.७३ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे डांबरीकरण केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शासनाद्वारे गत अनेक वर्षांपूर्वी लाखांदूर ते पवनी या राज्यमार्गाचे बांधकाम केले गेले. या मार्गावरून तालुक्यातील तसेच आंतरजिल्ह्यातील नागरिकांची नियमित ये-जा सुरू होती. मात्र लाखांदूर तालुक्यातील ढोलसर व पवनी तालुक्यातील आसगावपर्यंत मंजूर रस्त्याचे बांधकाम झाल्याने दोन्ही तालुक्यातील नागरिकांना हा मार्ग फायदेशीर ठरून दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील अंतर कमी होण्याची चर्चा केली जात आहे.
लाखांदूर तालुक्यातील ढोलसर व पवनी तालुक्यातील आसगाव या जवळपास ३ किलोमीटर लांबीच्या मार्गाची दुर्दशा झाली असल्याची माहिती असून पावसाळ्याच्या दिवसांत या मार्गावरून दुचाकीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे.
शासनाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ढोलसर - आसगाव - शिवनाळा या दोन तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम निधीअभावी बंद पडले आहे. या मार्गांचे बांधकाम पूर्ण न करण्यात आल्याने पावसाळ्याच्या दिवसात या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाच्या बांधकामासाठी शासनाद्वारे तात्काळ निधी उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.