चुल्हाड ( सिहोरा) : राहायला सर्व सुविधांयुक्त घर असावे, फिरायला कार असावी, अशी अनेकांची इच्छा असते; परंतु सध्या नवीन घराचे बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे अनेकांचे नवीन घराचे स्वप्न महागाईच्या विळख्यात सापडले आहे. आधीच बांधकामाचे साहित्याचे वाढलेले भाव आता त्यात इंधन दरवाढीची भर पडली आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्याने पर्यायाने बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाली.
इंधन दरवाढीने सर्व क्षेत्रात महागाईने डोके वर काढले आहे. मुद्रांक शुल्क कमी केलेला असला तरी बांधकाम साहित्याच्या दरावर मर्यादा आणण्यासाठी इंधनाचे दरदेखील आटोक्यात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. दिवाळीनंतर बांधकाम साहित्याचे दर नेहमी वाढतात. बहुतांश लोक दिवाळीनंतर घराच्या बांधकामाला सुरुवात करतात. याचे मुख्य कारण बांधकामासाठी लागणारे मुख्यत्वेकरून पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते व गवंडीसुद्धा काम करण्यासाठी उपलब्ध होतात. परंतु, यंदा बांधकाम साहित्याचे भाव वाढण्याची अनेक कारणे ठरली. भाजलेल्या पक्क्या विटांची कमतरता भासू लागली आहे. विटांच्या गुणवत्तेवरदेखील प्रतिकूल परिणाम झाला आहे. सिमेंट, लोखंड दर देखील वाढत आहे. रेती मिळते तीही अव्वाच्या सव्वा भाव देऊन खरेदी करावी लागत आहे. कोरोनामुळे बांधकाम व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच डिझेलचे भाव वाढल्याने माल वाहतुकीचे दर वाढले आहे. बांधकाम व्यवसायात मंदी असली तरीदेखील बांधकाम साहित्याचे दर मात्र वाढले आहेत. सध्या जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव झाला नसल्याने रेती महागड्या भावाने घ्यावी लागत असल्याचे दिसून येत आहे. नवीन घराचे बांधकाम कमी प्रमाणात होत असल्याने अनेक गवंडी व्यावसायिकांच्या हाताला काम नाही. पयार्याने त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी दुसरे काम करावे लागत आहे.