मध्यम प्रकल्प चांदपूर जलाशयाचे पाणी वितरण करण्यासाठी सिहोरा गावात पाटबंधारे विभागाचे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या कार्यलयात उजवा व डावा कालवा अशी विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही विभागांना स्वतंत्र शाखा अभियंता व दिमतीला कर्मचाऱ्यांचा फौजफाटा नियुक्त करण्यात आले असला तरी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर पुन्हा रिकाम्या जागा भरण्यात आल्या नाहीत. कार्यलयात साधा चपराशी नाही. कर्मचारी नसल्याने शाखा अभियंत्यांनी प्रशासकीय कारभार तुमसरातून करण्यास सुरुवात केली आहे. याच विभागाच्या देखरेखीमध्ये रनेरा गावातील विश्रामगृह आहे. विश्रामगृहाचे बांधकाम जुने व जीर्ण झाले असल्याने नवीन इमारतीचे बांधकाम मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. नवीन विश्रामगृह शेतकरी व अधिकारी यांच्या आयोजित होणाऱ्या बैठकांसाठी उपयोगात येणार होता, याच दिशेने प्रस्ताव सादर करण्यात आला होता. खरीप व रबी हंगामातील पाणी वाटपाचे निर्णय घेण्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे; परंतु या बैठका घेण्यासाठी जागा नाही. यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांनी ताकदीने विश्रामगृह मंजुरीसाठी प्रयत्न केले होते; परंतु विश्रामगृहाचे बांधकाम रद्द करण्यात आले आहे. जीर्ण व जुन्याच विश्रामगृहाच्या आवाराला सुरक्षित करण्यासाठी सुरक्षा भिंत मंजूर करण्यात आली आहे. सुरक्षा भिंतीमुळे मौल्यवान वृक्ष सुरक्षित राहणार आहेत.
बॉक्स
चांदपूर पॅटर्न राबवा
ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात ब्रिटिशकालीन विश्रामगृहांचे बांधकाम होते. या विश्रामगृहांत पाटबंधारे विभागाचे अधिकारी पाणी वाटपात मुक्काम करीत होते. नंतर या विश्रामगृहांचे देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे नागरिकांनी साहित्य चोरून नेले. नंतर माजी आमदार चरण वाघमारे यांनी पावणेदोन कोटी खर्चाच्या विश्रामगृहाचे बांधकाम खेचून आणले आहे. सर्व सुविधायुक्त विश्रामगृहाचे बांधकाम करण्यात येत आहे. हाच पॅटर्न रनेरा गावात राबविण्याची मागणी किशोर राहगडाले, योगराज टँबरे यांनी केली आहे.