१० लोक २३ के
तुमसर : तालुक्यातील गोबरवाही येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एकमेव राष्ट्रीयकृत बँक शाखेत दररोज ग्राहक पैसे भरणे व काढण्याकरिता येतात. बँकेच्या कार्यक्षेत्रात दोन मॅगनीज खाणी येत असल्यामुळे या बँकेत खातेदारांची संख्या लक्षणीय आहे. परंतु येथील बँक शाखेत कर्मचारी व काऊंटरचा पुरेसा अभाव असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या ग्राहकांना तीन तीन तास ताटकळत रांगेत राहावे लागते. परिणामी बँक प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
भारतीय स्टेट बँक इंडियाच्या गोबरवाही शाखेत परिसरातील ३५ ते ४० किलोमीटरहून दररोज बँक खातेदार कामानिमित्त येत असल्याने व चिखला तसेच डोंगरी बुज. मॅगनीज खाणीतील मजुरांचे खाते उघडले असल्याने या बँक शाखेत खातेदारांची नेहमीच गर्दी असते. मात्र गोबरवाही शाखेत मोजकेच कर्मचारी असल्याने ग्राहकांना काऊंटर व्यवहार करण्याकरिता दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागते. कामाचा व्याप लक्षात घेता येथील शाखेत काऊंटरची संख्या वाढविणे आवश्यक होती.
परंतु ग्राहकांची दशा होत असतांना बँक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. छोटे, मोठे व्यापारी यांचे व्यवहार ठप्प पडले आहेत. एटीएम मशीन वारंवार बंद होत असल्याने ग्राहकांना बँक शाखेतूनच व्यवहार करावा लागतो. त्यामुळे एटीएम नियमित सुरळीत सुरू ठेवावे शिवाय बँक शाखेचे कर्मचारी तसेच काऊंटर त्वरित वाढवावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे व ग्राहकांनी बँक प्रशासनास केली आहे.