चुल्हाड ( सिहोरा ) : वैनगंगा नदी तिरावरील सिहोरा परिसरातील गावांत नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. लालसर व गढूळ पाणी उपलब्ध होत असल्याने नागरिक हातपंपाच्या पाण्यावर तहान भागवित आहेत. धरणात अडविलेल्या पाण्याला जलशुद्धिकरणाची सोय नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे अनेक आजार बळावत आहेत.
ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत नळ योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. या योजनेला जलशुद्धिकरण केंद्राची सोय नसल्याने नदी पात्रातून थेट उपसा करण्यात येतो. पाणी लालसर आणि गढूळ असल्याने नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करीत नाहीत. या पाण्याचा वापर आंघोळीसाठी करण्यात येत आहे. वैनगंगा नदीवर कवलेवाडा शेजारी धरणाचे बांधकाम करण्यात आल्याने गढूळ व दूषित पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या धरणात पाणी अडविण्यात आले आहे. दरम्यान नळ योजनांना जलशुद्धिकरण केंद्र मंजूर करण्यात आले नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट या गावात निर्माण होत आहे. चुल्हाड, सुकळी नकुल, देवरी देव, गोंडीटोला, बपेरा गावात ही समस्या वाढत आहे. या गावात गढूळ व दूषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेक आजाराचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. परंतु कधी या पाण्याची चौकशी करण्यात येत नाही.
बपेरा गावांचे हद्दीत सुकळी नकुल प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. अडीच लाख लिटर पाणी क्षमतेचे जलशुद्धिकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. परंतु ही महत्वाकांक्षी योजना भंगारात निघाली आहे. या योजनेचे संचालन योग्य रीतीने करण्यात आले नाही. पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करतांना यंत्रणा गंभीर झाली नाही.
कावीळच्या रुग्णांची आयुर्वेदिक उपचाराकडे धाव
गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने कावीळच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहेत. या आजाराचे रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जात नाहीत. गावात प्राप्त होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारासाठी धाव घेत आहेत. यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना या आजाराचा गावात प्रसार झाला असल्याची पुसटही कल्पना येत नाही. आयुर्वेदिक औषध उपचाराने कावीळ आजार बरा होतो असा विश्वास नागरिकांत आहे. यामुळे शासन स्तरावर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
कोट
गोंडीटोला गावात नळ योजनेने नागरिकांना पाणी पुरवठा होत असला तरी वॉर्ड क्रमांक २ आणि ३ मध्ये योजनेचे पाणी पोहचत नाही. जिल्हा परिषद अंतर्गत सौर ऊर्जेवरील नळ योजना मंजूर करण्याची गरज असून नद्यांचे काठावरील गावांत मिनी जलशुद्धिकरण केंद्राची आवश्यकता आहे.
शीतल चिंचखेडे, वैशाली पटले
सदस्या ग्रामपंचायत गोंडीटोला