: पालिका प्रशासनाला निवेदन
तुमसर : जीर्ण पाइपलाइनमुळे गत महिनाभरापासून तुमसर शहरातील प्रभाग क्रमांक २ व ३ मध्ये नळाद्वारे दुर्गंधीयुक्त व काळसर पिण्याचे पाणी येत आहे. तसेच अनेक नळांच्या तोट्यांमध्ये जंतू आढळून येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. नगरपालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने पावले उचलावी व जीर्ण पाइपलाइन तत्काळ बदलून नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी द्यावे, अशी मागणी चर्मकार समाजाने दिलेल्या निवेदनात केली आहे.
तुमसर शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन ही पूर्णत: जीर्ण झाली असल्याने जागोजागी लिकेज झाली आहे. परिणामी तुमसर शहरातील प्रभाग क्र. २ सिहोरा रोड, ठवरे चौक ते नाका नं. ४ पर्यंत व प्रभाग क्र. ३ येथील ठवरे चौक ते शालिक भोंडेकर यांच्या घरापर्यंत पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनमध्ये गत एक महिन्यापासून नळाद्वारे दूषित, दुर्गंधी व नालीचे पाणी येत आहे.
परिणामी, नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे नागरिक भयभीत झाले असून, नगर परिषद प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये असंतोष व क्रोधीत झाले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तत्काळ प्रभाग क्रमांक २ व प्रभाग क्रमांक ३ येथील जीर्ण पाइपलाइन काढून नवीन पाइपलाइन टाकण्याच्या मागणीचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी चर्मकार समाज सेवा संघाचे शालिक भोंडेकर, कन्हैया भोंडेकर, प्रभूदास बर्वेकर, देवानंद बर्वे, गुलजार मालाधरे, वसंत बोरकर, मनोज बर्वे, राजेश भोंडेकर, गणेश जगणे, राजन तांडेकर, श्रीकांत भोंडेकर, हेमंत तांडेकर, सुरेश करोळे यांच्यासह प्रभागातील नागरिक व चर्मकार समाज सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.