पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांचे आवाहन : पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक
पालांदूर : समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारीचे भान ठेवत सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांनी केले. ते पोलीस स्टेशन पालांदूर येथे शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.
या वेळी नायब तहसीलदार दोनोडे लाखनी, मंडळ निरीक्षक सोनावणे, ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत, सरपंच पंकज रामटेके, तु. रा. भुसारी, माजी जि. प. सदस्य भरत खंडाईत, उद्योगपती इद्रिस लद्धानी, उपसरपंच स्वप्निल खंडाईत कवलेवाडा, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजय कापसे, प्राध्यापक आनंदराव मदनगर, पोलीस पाटील रमेश कापसे, पो.पा. गुणीराम बोरकर कवडसी, माजी सरपंच गुनाबाई बेलखोडे मेंगापूर, माजी सरपंच वैशाली खंडाईत, तंटामुक्त अध्यक्ष केवळराम कापसे, सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे, रत्नाकर नागलवाडे, मंगेश येवले, त्रिरत्न बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष दिलीप बडोले, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते राघो फुल्लुके गुरुजी, एन. व्ही. साखरे गुरुजी, गजेंद्र गजभिये गुरुजी, अविनाश बडोले, जिल्हा पत्रकार संघाचे डी. एफ. कोचे, राजू आगलावे, मिलिंद हळवे, ‘सकाळ’ वृत्तपत्राचे प्रतिनिधी मुरलीधर नंदुरकर, तथा ग्रामपंचायत कवलेवाडाचे पदाधिकारी गण व त्रिरत्न बुद्ध विहार समितीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
पुढे सण-उत्सव असल्याने समाजामध्ये जातीय, राजकीय, धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, प्रत्येकाने कायद्याच्या चाकोरीत राहून समाजात शांतता व सुव्यवस्था निर्माण करावी, समाज माझा मी समाजाचा, गाव माझा मी गावाचा या नात्याने प्रत्येकाने सलोख्याचे संबंध ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले.
त्याचप्रमाणे कवलेवाडा ग्रामपंचायत व त्रिरत्न बुद्ध विहार पालांदूर यांच्यात असलेला वाद चर्चेतून शांततेच्या मार्गाने सोडविण्याकरिता प्रत्येकाने चर्चेत सहभागी व्हावे.
समता सैनिक दलाचे फलक काढण्याच्या विषयातून निर्माण झालेला वाद आपसात बसून सोडविता येईल. या विषयात प्राथमिक माहिती घेतलेली आहे. त्यावर योग्य ती काय कारवाई करायची याकरिता वरिष्ठांना मार्गदर्शन मागितले आहे. तेव्हा प्राथमिक तपासणीत जे निष्पन्न झाले त्यातून एवढेच पुढे आले आहे की, त्रिरत्न बुद्ध विहारासमोरील व व्यापारी गाड्याला लागून असलेली मोकळी जागा ही सार्वजनिक आहे. ग्रामपंचायत कवलेवाडा यांची त्यावर देखरेख आहे. त्या जागेवर कुणीही अतिक्रमण अथवा मालकी गाजवू नये. ती जागा आठवडी बाजार, सामाजिक, धार्मिक व इतर कामाकरिता वापरण्याची मुभा आहे. त्यामुळे सदर विषयाला कोणतेही वादग्रस्त वळण न देता लोकशाही मार्गाने विषयाला न्याय देता येईल. तेव्हा प्रत्येकाने विषयाचे गांभीर्य समजत आपापसांत न भांडता शांततापूर्ण मार्गाने प्रत्येकाला स्वतःच्या अधिकारात राहून सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे विचार सभास्थळी पोलीस निरीक्षक मनोज मडावी, नायब तहसीलदार दोनोडे यांनी मांडले.
दिलीप बडोले, डी. एफ. कोचे, भरत खंडाईत, तु. रा. भुसारी, दामाजी खंडाईत यांनीसुद्धा वादग्रस्त विषयावर आपापली मते मांडत कायद्याच्या चाकोरीतून जाण्याचे व आपापल्या अधिकारात राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले. शांतता समितीच्या बैठकीला पोलीस हवालदार कचरू शेंडे, नावेद पठाण, प्रतीक बोरकर आदींनी सहकार्य केले.