भंडारा : पंतसंस्थेच्या अनियमित आर्थिक व्यवहाराने ठेवीदार पैशाचा सारखा तगादा लावत असल्याने, एका पतसंस्थेच्या व्यवस्थापकाने त्रस्त होऊन स्वत:च्या शेतातील विहिरीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भंडारा लगतच्या टवेपार येथे गुरूवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
अनिल श्रीकृष्ण कढव (४५) रा. टवेपार असे मृताचे नाव आहे. ते २००७ पासून भंडारा येथील परमात्मा एक सेवक सहकारी पतसंस्थेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. गत तीन-चार वर्षांपासून पतसंस्थेच्या अर्थिक व्यवहारात अनियमितता आली. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे वेळेवर मिळत नव्हते. ठेवीदार व्यवस्थापक अनिल कढव यांना पैशासाठी तगादा लावत होते. अनिलने आपल्या शेतातील विहिरीच्या लोखंडी कडीला दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केली. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांचा भाऊ सुनील कढव यांनी भंडारा शहर ठाण्यात दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे, तसेच शेतीतूनही पुरसे उत्पन्न येत नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
अनिलने आत्महत्या केल्याची माहिती गावात होताच, नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. भंडारा शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तूर्तास पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.