दरवर्षी जिल्ह्याला पुराचा फटका बसतो. गतवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर हाहाकार उडाला होता. वैनगंगेसह बावनथडी, वाघ, सूर नद्यांना महापूर आला होता. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासून तयारी चालविली आहे. मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक घेऊन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.
पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी मध्य प्रदेशातील बालाघाट, सिवनी, छिंदवाडा या जिल्ह्यांसह चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून राहणार आहेत. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा नियंत्रण कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष भंडारा येथील नियंत्रण कक्षाशी नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास या समन्वयातून आपत्तीशी सामना करणे सोपे जाणार आहे. यासोबतच सहा जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एक व्हॅट्सॲप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. त्यातून पूरपरिस्थितीची माहिती आणि उपाययोजनाबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाने पहिल्यांदाच अशा उपाययोजना केल्या आहेत. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सचिन पानझाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायतींनी आपल्या क्षेत्रातील नाले, नाली साफसफाई करावी. पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे, जिल्ह्यात मासेमारी करणाऱ्या संघटनांची बैठक घेऊन ते वापरात असलेल्या बोट बचाव यंत्रणेसाठी उपलब्ध होतील असे नियोजन करावे, असे निर्देश दिले. तसेच गोसेखुर्दच्या पाणीपातळीवर विशेष लक्ष देऊन संजय सरोवर व बावनथडी प्रकल्पाशी समन्वय साधला जावा.
जिल्ह्यात १३० गावांना बसतो पुराचा फटका
जिल्ह्यात १५४ गावे नदितीरावर आहेत. त्यापैकी १३० गावांना पुराचा फटका बसतो. पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील १८ गावांचा संपर्क तुटतो. आगामी पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी विविध उपाययोजना आजच्या बैठकीत सुचविण्यात आल्या. पूरपरिस्थितीत नागरिकांना सुरक्षित हलविण्यासाठी जागा शोधून ठेवणे. पर्यायी मार्ग, राहण्याची व्यवस्था, औषधी साठा उपलब्धतता याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी गावांना भेटी देऊन पाहणी करावी अशी सूचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिली आहे. मान्सून कालावधीपूर्व संबंधित विभागाने रस्ते, शाळा, समाजमंदिरे, सार्वजनिक इमारती याची तपासणी करुन वापरण्यास योग्य असल्याचा अहवाल सादर करावा, असे आवाहन करण्यात आले.