२०१९ मध्येही उष्माघाताने एकही जण मृत्यू पावला नाही, याची शासन दप्तरी नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी मे हिटचा तडाखा सर्वांनाच सहन करावा लागतो. तापमान ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. अशा वेळी मानवी मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. मात्र, २०१९ पासून उष्माघातामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. गतवर्षी म्हणजेच २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बहुतांश काळ लॉकडाऊन असल्याने नागरिक घरातच होते. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात उष्णतेचा फटका अनेकांना जाणवला नाही. त्यामुळेच मानवीय जीवहानी झाली नाही. या वर्षी १७ मेपर्यंत तापमान वाढत असले, तरी उष्माघाताने कोणाचाही मृत्यू झाल्याची नोंद अद्यापपर्यंत झालेली नाही. कोरोनाच्या भीतीने उष्माघात पळाला की काय, अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, गत १७ दिवसांत तीन वेळा अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अधून-मधून उष्णतेची दाहकता लक्षात येत होती. मात्र, संचारबंदीमुळे सकाळी ११ वाजता नंतर रस्ते सामसूम होतात. नागरिकांची रहदारी कमी झाल्याने उन्हाची दाहकता कमी सोसावी लागत असल्याचे दृश्य सध्यातरी दिसत आहे.
बॉक्स
ऊन वाढले तरी...
या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढत होती. एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके जाणवू लागले. मे महिन्यात तर पारा ४४ अंशांपर्यंत पोहोचला. संचारबंदीमुळे नागरिक घरीच अडकून होते. ऊन वाढले, तरी नागरिक घराबाहेर पडले नाहीत. सकाळी सात ते अकरा या वेळेतच नागरिक घराबाहेर सामान घेण्यासाठी बाहेर निघतात.
बॉक्स
उन्हाळा घरातच
गतवर्षी मार्च महिन्यात जनता कर्फ्यूनंतर सातत्याने नागरिकांना लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी एप्रिल ते जून या कालावधीपर्यंत उन्हाळा तीव्र असतानाही उन्हाची दाहकता कुणालाच सहन करावी लागली नाही. मात्र, व्यापार व उद्योगांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली. अनेकांना आर्थिक फटकाही बसला, परंतु दुसरीकडे उष्माघाताची कुठलीही समस्या पाहायला मिळाली नाही.
कोट
लॉकडाऊन व संचारबंदीमुळे गतवर्षीपासून नागरिक उन्हाळ्यातही घरात आहे. गत तीन वर्षांपासून उष्माघातामुळे कोणाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही. उन्हापासून बचाव करण्याकरिता काळजी घेण्याची गरज आहे.
- अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा
तीन वर्षांतील उष्माघाताचे बळी
२०१९ - ००
२०२०- ००
२०२१- ००