जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्वच स्तरातील एकूण ९७४ शाळा आहेत. यात जिल्हा परिषदेच्या ७६३ प्राथमिक तर माध्यमिक विभागाच्या एकूण ३२ शाळा आहेत. २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली नाही. जून महिन्यात कोरोना संक्रमण उच्चस्तरावर पोहोचला असताना राज्य शासनाने शाळा बंदचा निर्णय घेतला, तो आजपर्यंत कायम आहे. जिल्ह्यातील सर्वच स्तरातील ९७४ शाळांमधील १ लाख ३६ हजार ४०५ (विद्यार्थी इयत्ता पहिली ते आठवी) घरीच विद्यार्जन करीत आहेत. अर्थात यासाठी ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा आधार घेण्यात येत आहे. मात्र अनेक पालकांकडे स्मार्ट फोन नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा सावळा गोंधळही कायम आहे. त्यातच विद्यार्थ्यांचा मुलभूत शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचीही बाब समोर आली आहे. कोरोना संकटकाळात शिक्षण क्षेत्रात पाल्यांना विविध स्तरावर समस्यांचा सामना करावा लागत असून याचा परिणाम पालकांवरही जाणवत आहे.
कोट
गत सहा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकत आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी तांत्रिक बाबींचा फटका शरीर व मनावर प्रतीबिंबीत होत आहे. याचा वाईट अनुभवही अनेक पालकांना येत आहे. कोरोनाचे भय अजूनही संपले नसून सरत्या वर्षातही पाल्यांच्या शिक्षणाबाबत साशंकता कायम आहे.
-मनोज बोरकर, पालक भंडारा.
कोट