भंडारा : विवाहाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. परंतु, त्याला कोरोना साथीने ग्रहण लावले आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे लग्नसमारंभ तूर्तास पुढे ढकलण्यात येत आहेत. भंडारा येथील ऑफिसर्स काॅलोनीस्थित कोटांगले परिवारांनी आपल्या लेकीच्या लग्नाला तूर्तास स्थगिती दिली असून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.
ऑफिसर्स काॅलोनी भंडारा येथील रहिवासी व भंडारा जिल्हा पोलीस दलात कार्यरत मिलिंद कोटांगले यांची लेक ऋतूजा हिचा विवाह नाशिक येथील जयवंत पगारे यांचा मुलगा शरद यांच्यासोबत २६ एप्रल रोजी ठरला होता. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येत वाढल्याने राज्य शासनाने १५ एप्रिल पासून राज्यात संचारबंदी घोषित केली. सामाजिक दायित्व ओळखून समाजातील घटक कोरोना संक्रमित होऊ नये व कोरोना उद्रेकाला थोपविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. समाजासोबत असलेली बांधिलकी जोपासून मिलिंद कोटांगले यांनी नियोजित तारखेचा लेक ऋतुजाचा विवाह तूर्तास स्थगित केला आहे. कोरोना साथ संपल्यानंतर तो करण्याचा निश्चय केला. यासंदर्भात त्यांनी पगारे कुटुंबीयांना तसे कळिवले असता त्यांनीही कोटांगले परिवारास तूर्तास लग्न स्थगित करण्यास होकार दर्शविला.
कोटांगले कुटुंबीयांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्याची चर्चा पंचक्रोशीत सुरू असून परिवाराकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.