लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसचे पुन्हा एकदा चाक थांबले आहे. कोरोना संचारबंदीच्या काळात परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागाला दररोज ३५ लाखांचा फटका बसत आहे. सध्या सुरू असलेल्या ८ बसेसच्या माध्यमातून महामंडळाला रोज २५ ते ३० हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. पहिल्या लाॅकडाऊनपेक्षाही यावेळी स्थिती गंभीर झाल्याचे दिसत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागात गोंदिया जिल्ह्याचाही समावेश आहे. सहा आगार असून, ३८१ बसेस आहेत. भंडारा विभागाला पूर्वी दररोज साधारणत: ३६ लाख रुपयांचे मिळत होते. सर्व बसेस रस्त्यावर धावत होत्या, परंतु १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कोरोना संचारबंदी जारी झाली. याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला झाला आहे. केवळ २२ प्रवासी वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या उद्रेकाने २२ प्रवासीही मिळणे कठीण झाले आहे. सद्यस्थितीत केवळ ८ बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यात भंडारा-नागपूर आणि गोंदिया - नागपूर यासह तिरोडा मार्गावर एक बस धावते. राज्य परिवहन महामंडळाचे भंडारा आगाराचे भारमान ५८ वरून २९ पर्यंत खाली आले आहे. प्रवासीच मिळत नसल्याने बसेस बंद आहेत. चालक आणि वाहकांना एक दिवस आड ड्युटी दिली जाते. एसटी महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पहिल्या लाॅकडाऊनमध्ये तर तीन महिने पगारच झाला नव्हता. यावेळी मार्च महिन्याचा कसाबसा पगार झाला, परंतु एप्रिल महिन्यात पगार होतो की नाही, अशी शंका राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आहे. लोकवाहिनी म्हणून एसटी बसची ओळख आहे. ग्रामीण असो की शहरी प्रवासासाठी एसटी बसचाच आधार घ्यावा लागतो. परंतु कोरोना संसर्गापासून एसटी महामंडळ डबघाईस आले आहे. गत वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून एसटी महामंडळाला कोरोना संसर्गाचा सामना करावा लागत आहे. आता तर कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्याने प्रवाशांनीच बसकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. भंडारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर दिवसभर शुकशुकाट असतो. काही मोजके प्रवासी सोडले तर एसटीचेच अधिकारी आणि कर्मचारी बसस्थानकावर दिसून येतात. बसस्थानकाशी संबंधित व्यवसायालाही फटका बसला आहे.
सोमवारचे उत्पन्न ३० हजार रुपयेदररोज ३६ ते ३७ लाख उत्पन्न मिळविणाऱ्या भंडारा विभागाला सोमवारी निच्चांकी उत्पन्न झाले. १,५३३ किलोमीटर बस धावल्यानंतर महामंडळाला केवळ ३० हजार रुपये मिळाले. विशेष म्हणजे, आठवड्याचा पहिला दिवस असतानाही निच्चांकी उत्पन्न मिळाले. कोरोना संसर्गामुळे एसटी कडे पाठ फिरविली असून, सर्व बस स्थानकावरही शुकशुकाट दिसून येत आहे.
राज्य परिवहन महामंडळाला संचारबंदीचा मोठा फटका बसत आहे. उत्पन्न ठप्प झाले असून, शिवशाही बसही बंद आहे. एसटीचे पर किलोमीटर अर्निंग २२ रुपयांवरून १५ रुपयापर्यंत खाली आले आहे. या संकटाच्या काळात एसटी महामंडळ अत्यावश्यक सेवेसाठी तत्पर आहे. -डाॅ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी