जिल्हा ग्राहक न्यायालयात दरवर्षी वीज वितरण कंपनी, कृषी विभाग, विमा कंपनी, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, बँक फायनान्स, एटीएम, आरटीजीएस यासारख्या विविध विषयांवर ग्राहकांच्या तक्रारी दाखल होतात. यामधून ग्राहकांना न्याय मिळतो. मात्र कोरोनामुळे ही प्रक्रिया अलीकडच्या काळात रखडली आहे. यासोबतच या मंचला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. या विभागात पाच पदे रिक्त आहेत. महत्त्वाची पदे रिक्त असल्याने ग्राहक मंचाचे कामकाजच प्रभावित झाले आहे. हा कारभार सांभाळणारे अध्यक्षपद रिक्त आहे. यासोबतच सहायक अधीक्षक, प्रबंधक, लिपिक/टंकलेखक ही महत्त्वपूर्ण पदे रिक्त असल्याने मर्यादित मनुष्यबळावर संपूर्ण कामकाज आले आहे.
२०२० मध्ये दाखल तक्रारी
जानेवारी ९, फेब्रुवारी २१, मार्च ९, एप्रिल ५, मे १९, जून ११, जुलै ७, ऑगस्ट ०, सप्टेंबर ०, ऑक्टोबर १०, नोव्हेंबर ११, डिसेंबर १५
तक्रारी नेमक्या काय?
-ग्राहकांची फसवणूक झाल्यानंतर न्याय मिळविण्यासाठी ग्राहकांनी न्यायालयात धाव घेतली, यामध्ये संबंधित कंपनी, संस्था, बँक यासह विविध घटकांच्या विरोधात न्यायासाठी तक्रारी दाखल केल्या.
- सर्वाधिक तक्रारी विमा, कृषी विभागाच्या आहेत. बोगस बियाणे उगवलेच नाही. तर अनेक शेतकऱ्यांनी कंपन्यांनी केलेले दावे फोल असल्याचा आरोप करीत ग्राहक न्यायालयामध्ये न्यायासाठी तक्रार दिल्या आहेत.
तक्रारी कशा स्वरूपाच्या होत्या
दाखल झालेल्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत. कंपन्यांनी अथवा संबंधितांनी केलेले दावे फोल ठरले आहेत. अशा प्रकरणी फसवणूक झाल्यामुळे ग्राहकांनी न्यायाकरिता ग्राहक न्यायालयामध्ये धाव घेतली, कंपनीने झालेली फसवणूक भरून काढावी. त्याचा मोबदला द्यावा, अशी रास्त अपेक्षा ठेवून ग्राहक न्यायालयामध्ये तक्रारी दाखल करीत आहेत.
ग्राहक न्यायालयाचे कामकाज प्रभावित
जिल्हा न्यायालयाकडे पीक विमा कंपनी, वीज वितरण कंपनी, बँक यासह विविध क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी निवारण्याचे काम ग्राहक मंच करीत आहे. यासोबतच ग्राहक न्यायालयाला रिक्त पदांमुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाच पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामाचा ताण मर्यादित कर्मचाऱ्यांवर येऊन पडला. ग्राहक न्यायालयाचे कामकाज प्रभावित झाले असल्याचे दिसून येते.