भंडारा : सोमवारी पुन्हा एकदा कोरोनाबाधित आढळले नाहीत. आज १४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी कुणीही पाॅझिटिव्ह आढळून आलेला नाही. जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असून नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सणासुदीचा काळ असल्यामुळे बाजारपेठेत गर्दी पहायला मिळत आहे. कोरोनाच्या सावटात सण - उत्सव साजरे करताना नियमांची पायमल्ली होणार नाही याची काळजी घ्या असेही प्रशासनाने बजावले आहे. कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असलो तरी कोरोनाची भीती कायम असल्याचेही सांगण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर नियमांचे पालन गरजेचे असून प्रत्येकाने लस घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४ लक्ष ५३ हजार ३३८ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ६० हजार ८५ नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर ५८ हजार ९५१ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सद्यस्थितीत भंडारा तालुक्यात एकच सक्रिय रुग्ण उपचार घेत आहे. कोरोनामुळे गत दीड वर्षात ११३३ जणांचा मृत्यू झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के आहे.
जिल्ह्याचा मृत्यूदर ०१.८९ इतका आहे. जिल्हा व अन्य रुग्णालयात गर्दी टाळण्याकरिता नागरिकांनी ई संजीवनी ॲपचा वापर करावा तसेच कोविड नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.