मांढळ येथील घटना
लाखांदूर : दोन भिन्न गोत्रातील नव वर-वधूच्या लग्नसमारंभाची तारीख सुनिश्चित करण्यात आली. लग्न तारीख निश्चित झाल्याने उभय कुटुंबीयांकडून लग्नसमारंभासाठी आवश्यक साहित्याची खरेदी व लग्नपत्रिका काढून त्यांचे वितरण आप्तेष्टांसह मित्रपरिवारातदेखील करण्यात आले. मात्र, तालुक्यात अचानक कोरोना विषाणूचा प्रभाव वाढल्याने या विषाणूच्या संभाव्य संसर्गाची खबरदारी घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निश्चित झालेले लग्न कोरोना पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आले आहे. हे लग्न दोन्ही नव वर-वधू परिवारांकडून पुढे ढकलण्यात आल्याने जनतेत या दोन्ही परिवारांच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. या समाजाला प्रेरणादायी व आदर्शवत ठरणारा निर्णय तालुक्यातील मांढळ गावात घेण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील मांढळ गावातील एका नववधूचे आंतरतालुक्यातील एका नव वरासोबत लग्न पक्के करण्यात आले. लग्न पक्के होताच लग्नाची तारीखदेखील निश्चित करण्यात आली. या तारखेनुसार हे दोन्ही नव वर-वधू ११ एप्रिल रोजी सामाजिक रितीरिवाजानुसार विवाह बंधनात अडकणार होते. हे लग्न नववधूच्या राहत्या घरी पार पाडले जाणार होते.
दरम्यान, तालुक्यात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना तालुक्यातील तीन गावे कोरोना पार्श्वभूमीवर प्रतिबंधितदेखील करण्यात आली. या संबंध परिस्थितीची दखल घेत ग्रामीण भागातील मांढळ गावात लग्न समारंभासाठी होणारी गर्दी व त्यामुळे कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने लग्नाची तारीख पुढे ढकलण्याची सूचना केली.
या सूचनेनुसार नववधूकडील परिवाराने नव वराच्या परिवाराकडे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यासंबंधाने सकारात्मक चर्चा केली. त्यानुसार वर-वधू परिवारांच्या संमतीने लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली.
दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासन स्तरावर नियमित निर्देश व प्रतिबंधात्मक उपययोजना निर्गमित केल्या जात असताना बहुतांश ठिकाणी नागरिकांकडून निष्काळजी व हलगर्जीपणा होऊन नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या अनेक घटना समाजात घडताना दिसत आहेत. मात्र, लग्नसंबंधामधून दोन भिन्न गोत्रांची खूणगाठ बांधणारा लग्नसोहळा कोरोना पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्याने दोन्ही नव वर-वधू परिवारांनी घेतलेला निर्णय समाजासाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद ठरल्याचे बोलले जात आहे.