लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध कमी करण्यासाठी शासनाच्या मापदंडात भंडारा जिल्हा परिशिष्ट अ मध्ये आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या निर्बंधात शिथिलता देण्याचे आदेश शुक्रवारी निर्गमीत केले आहे. यामुळे शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग यासोबतच विविध आस्थापना पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.कोरोना संसर्गाची तिसरी लाट आता ओसरली आहे. शासनाने १ मार्च रोजी काेविड प्रतिबंधात्मक लसीची स्थिती पाहून जिल्ह्याचे वर्गीकरण करण्याचे ठरविले. पहिला डोस ९० टक्के पेक्षा जास्त व दुसरा डोस ७० टक्के पेक्षा जास्त व पॉझिटिव्हिटी रेट १० टक्केपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यांना निर्बंधात सूट देण्याचे ठरविले होते. त्यानुसार भंडारा जिल्हा परिशिष्ट अ मध्ये आल्याने प्रतिबंधात्मक निर्बंधामध्ये शिथिलता देण्याचे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहे.राष्ट्रीय उद्यान, सरकारी बगीचे, प्रेक्षणीय स्थळे, मनोरंजन स्थळे, ब्युटी पॉर्लर, केशकर्तनालय, जीम, रेस्टारंट, खाणावळी, भोजनालय, उपहारगृहे, हॉटेल, सिनेमागृह, नाट्यगृह यासोबतच शाळा, महाविद्यालय शिकवणी वर्ग, अंगणवाडी नियमित वेळेनुसार पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. लग्नसमारंभ, अंत्यविधी यासह सामाजिक, धार्मीक, राजकीय व इतर उत्सवांसाठी नियमित वेळेनुसार ५० टक्के क्षमतेने किंवा हजार व्यक्ती यामध्ये जी संख्या कमी असेल त्यानुसार उपस्थिती ठेवण्याचे निर्देश दिले आहे. मात्र यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाची परवानगी घेणे अनिवार्य राहणार आहे. सर्वसामान्य जनतेला सेवा देणाऱ्या आस्थापना, घरपोच सेवा देणाऱ्या संस्था, सार्वजनिक वाहतूक सेवा, मॉल, नाट्यगृह, सिनेमा, प्रेक्षणीय स्थळे आदी ठिकाणी काम करणारे कर्मचारी भेट देणाऱ्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच औद्योगिक संस्थेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेतले असेल तरच परवानगी देण्यात येणार आहे. आंतरजिल्हा व आंतरराज्यीय प्रवासासाठी पूर्ण लसीकरण किंवा ७२ तासामधील निगेटिव्ह, आरटीपीसीआर रिपोर्ट असणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे भंडारा जिल्ह्याला आता मोठा दिलासा मिळाला असून कोरोना निर्बंध कमी झाल्याने सर्व व्यवहार सुरळीत होणार आहे.
शासकीय कार्यालय पूर्णक्षमतेने
- कोरोना संसर्गामुळे शासकीय, अशासकीय निमशासकीय, औद्योगिक संस्था, प्रशिक्षण संस्था आदींमध्ये कर्मचारी उपस्थितीचे बंधन होते. यामुळे अनेक कार्यालयात दुसऱ्या व तिसऱ्या लाटेत कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी दिसत होती. मात्र आता निर्बंधात शिथिलता मिळाली असून नियमित वेळेनुसार सर्व शासकीय, निमशासकी कार्यालयासह सर्व प्रकारच्या प्रशिक्षण संस्था पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे शासकीय कार्यालयात असलेले कामे वेळेवर पूर्ण होणार असून सर्वांनाच यामुळे दिलासा मिळणार आहे.