गुढीपाडव्याप्रमाणेच अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत अनेकजण नवीन घर खरेदी, गाडी, दुचाकी, सोने तसेच अन्य कोणतीही नवीन खरेदी अथवा चांगली कामे या दिवशी करतात. मात्र, जिल्ह्यासह राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याने ब्रेक द चेन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुकाने सकाळी अकरापर्यंत सुरू राहतात आणि दिवसभर बंद राहतात. छुप्या पद्धतीने काही दुकाने उघडली तरीही ग्राहक मात्र फिरकत नसल्याचे चित्र दिसून येते. वाढत्या कोरोनामुळे ग्राहकांनीदेखील सावध पवित्रा घेतला असल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याने बाजारपेठेत काहीशी शांतता आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे अलंकार, नवीन कपडे, मोबाईल, वाहन खरेदी अनेक व्यवहारांना प्राधान्य दिले जाते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे अनेक जण घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. अगदी जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह नसल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात फिरकत नसल्याचे दुकानदारांनी सांगितले.
दरवर्षी वाहनांची होणारी बुकिंग यावर्षी झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विविध खरेदीसाठी यावर्षी उत्साह ओसरला असल्याचेच चित्र आहे. वर्षानुवर्षांपासूनची असलेली परंपरा कोरोनामुळे साध्या पद्धतीनेच होत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
बॉक्स
अनेक दुकानदारांकडून होम डिलिव्हरीची सोय
गेल्या काही दिवसांपासून कोरोना वाढत असल्याने अनेक दुकानदार शासन नियमांच्या पालनात होम डिलिव्हरीची सोय करीत आहेत. अनेक प्रकारच्या वस्तू घरपोहोच होत असल्याने आता अनेकांचा घरी बसूनच विविध वस्तू खरेदीकडे कल वाढला असल्याचे दिसून येते. सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. अगदी ५३ ते ५५ हजार रुपयांवर प्रती तोळा गेलेले सोने आता ४३ हजार रुपयांवर आले. महिलांचा आता यामुळे सोने खरेदीकडे कल वाढत आहे.