: लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील आठवडी बाजारात कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यापाऱ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे चाचणी करून घेतली. यासाठी गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी पुढाकार घेतला.
ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढते कोरोना रुग्ण चिंतेचा विषय ठरलेले आहेत. रुग्णांची ओळख पटावी, त्यांच्यावर तत्काळ उपचार व्हावे, यासाठी पालांदूर येथे चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली. तसेच बाजारात मास्क न वापरणाऱ्यांना १०० रुपये दंड आकारला जात आहे. पालांदूर येथे तालुका समन्वयक नरेश नवखरे, सरपंच पंकज रामटेके, सरपंच केशव बडोले, उपसरपंच हेमराज कापसे, स्वप्नील खंडाईत, ग्रामविकास अधिकारी धनराज बावनकुळे, सचिव राधेश्याम पाथरे, कचरू शेंडे यांच्यासह इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तपासणीसाठी महत्त्वाची भूमिका निभावली. गर्दी न करता दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना गर्दी टाळण्याचा प्रयत्न करावा. तपासणी करून स्वतः इतरांनाही आरोग्यविषयक सजगता बाळगावी, अन्यथा आठवडी बाजार बंद करण्यात येईल, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी सांगितले.
कोट
नागरिकांनी स्वतःहून कोरोना तपासणीकरिता पुढे यावे. तपासणीत सरासरी १० टक्के रुग्ण आढळून आले. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
डॉ. अमित जवंजार,
आरोग्य अधिकारी, मऱ्हेगाव