लसीकरणासाठी जिल्हा कृतिदलाची बैठक जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ. माधुरी माथूरकर, डॉ. निखिल डोकरीमारे, डॉ. चव्हाण व कृतिदलाचे सदस्य उपस्थित होते. सीरम इन्स्टिट्यूट पुणे द्वारा निर्मित कोविशिल्ड लसीचे ९५०० डोज जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत.
शनिवारी तीन केंद्रांवर ३०० लाभार्थ्यांना लस देण्यात येईल. त्यानंतर आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार व गुरुवारला नियमितपणे लसीकरण करण्यात येणार आहे. चार हजार ७५० कोरोना योद्धे यांना डोज दिला जाणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात एक समन्वय समिती तयार केली आहे. त्यासोबत कोविन ॲपवर डेटा अपलोड करण्यासाठी एक चमू असणार आहे. टप्याटप्याने लसीकरण वाढविण्यात येणार आहे.
बॉक्स
स्नायूत ०.५ एमएल डोज
सीरम इन्स्टिट्यूटद्वारा निर्मित कोविशिल्ड लस स्नायूमधून पॉईंट पाच एमएल दिली जाणार आहे. एका व्हायलमध्ये दहा लाभार्थी कव्हर होणार आहेत. याच लाभार्थ्यांना २८ दिवसानंतर दुसरा डोज दिला जाणार आहे. कोविशिल्ड लसीचे दोन डोज घेतल्यानंतर पुढच्या १४ दिवसानंतर लस घेणाऱ्याच्या शरीरात ॲन्टिबॉडी तयार व्हायला सुरुवात होईल.