इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना महामारीपासून बचाव करायचा असेल तर लस हा एकमात्र व सुरक्षित असा उपाय आहे. मात्र सध्या लसींच्या प्रचंड तुटवड्यामुळे अनेकांना लस मिळत नाही. यावर आता कोरोना लसीचे कॉकटेल झाले तर मानवी शरीरावर परिणाम होतो काय, याबाबत चर्चा सुरू आहे. शासनाने याबाबत दिशानिर्देश जारी करीत कुठलाही परिणाम मानवी शरीरावर होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत वैद्यकीय तज्ज्ञही दुजोरा देत असले तरी काही तज्ज्ञांच्या मते कॉकटेल न केले तर बरे होईल असाही सूर उमटत आहे. परंतु नागरिकांनी दोन्ही बाबतीत घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही स्पष्ट केले आहे.लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून प्रत्येक जण आपापल्या परीने लसीकरण करण्यासाठी आतुर झाले आहे. विशेषतः तरुणांमध्ये लसीकरण करण्याबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. पुन्हा एकदा लसीकरण मोहीम सुरू झाल्यास लस घेण्यास अनेक जण पुढे येणार आहे. परंतु पहिला डोस घेतलेली घेतलेली लस दुसऱ्या डोसला हवी, असेही म्हणणारे बहुतांश लोक आहेत. सूचनेप्रमाणे तसे होत होते; मात्र आता नवीन दिशानिर्देशानुसार आधी कोविशिल्ड व नंतर कोव्हॅक्सिन घेतली तरी मानवी शरीरावर त्याचा कुठलाही परिणाम जाणवत नाही. दोन्ही लसी आपापल्यापरीने मानवी शरीरात अँटिबॉडिज तयार करतात. एकमेकांना कधीही विरोध करीत नसल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पहिली लसनंतर दुसरी अन्य लस घेतली तरी घाबरण्याचे कुठलेही कारण आता राहिले नाही. मात्र त्या प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक झाले आहे.भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत प्रथम व दुसरा डोस मिळून २ लाख ७४ हजार ६४० नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे. यात ४५ ते ५९ वयोगटातील प्रथम टप्प्यात अंतर्गत ७७ हजार २१७ नागरिकांनी प्रथम डोस घेतला तर २१ हजार ३२२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक अंतर्गत प्रथम डोस ८९ हजार ९३० जणांनी तर दुसरा डोस ४,२४५ नागरिकांनी घेतला आहे. १८ ते ४४ या वयोगटातील फक्त १२,१३६ नागरिकांना हा डोस मिळाला आहे. आताही या वयोगटातील साडेपाच लाखपेक्षा जास्त नागरिक लसीकरणासाठी प्रतीक्षा करीत आहेत.
पहिला डोज वेगळा अन् दुसरा डोज वेगळाच पहिला डोस कोविशिल्ड व दुसरा डोस कोव्हॅसिन घेतला तरी मानवी शरीरावर कुठलाही विपरीत परिणाम जाणवत नाही, अशी बाब वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. याबाबत शासनाने ही दिशानिर्देश जारी केले आहेत. जर डोस उपलब्ध नसेल तर अन्य लस घेण्यात कुठलीही आपत्ती नाही.
तज्ज्ञ डॉक्टर्स काय म्हणतात?
कोरोना महामारी अंतर्गत लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने लस घेतली पाहिजे. शक्यतोवर तीच लस घेतली तर बरे होईल. लसीचा कॉकटेल झालं तरी विपरीत परिणाम होत नाही. पण तसे करू नये, असे मला वाटते. -डॉ. नितीन तुरस्कर, अध्यक्ष, आयएमए, भंडारा
शक्यतोवर दोन्ही डोस एकच लस घ्यावे. शासनाचे दिशानिर्देश आहेत ते योग्य आहे. अँटिबॉडीज आपल्या स्तरावर परिणाम दर्शवितात. लस दुसरी घेतली तरी घाबरण्याचे कारण नाही उपचारावर विश्वास ठेवा.-डॉ. निखिल डोकरीमारे, जिल्हा रुग्णालय भंडारा.
विद्यमान स्थितीत कोरोना संकटावर लसीकरण हेच रामबाण उपाय आहे. कोणतीही लस घेतली तर शरीरात अँटिबॉडीज तयार होत असते. अन्य लस घेतली म्हणून विपरीत परिणाम होत नाही. लस कॉकटेल झाली म्हणून घाबरू नका. परंतु लसीकरण करणार नाही, अशी भूमिका घेणे योग्य नाही.- डॉ. मनोज चव्हाण, हृदयरोग तज्ज्ञ भंडारा.