लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात गत काही महिन्यांपासून जवळपास ५० टक्के आरोग्य अधिकारी कर्मचारी कंत्राटी असल्याची माहिती आहे. कोरोना महामारीकाळात कोरोनाबाधितांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी येथील आरोग्य विभागाने संस्थात्मक विलगीकरण केंद्र उघडले होते. या केंद्रात सर्वच कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती आहे.
तथापि सध्या शासनाने कोरोना लस उपलब्ध करताना या कक्षातदेखील येथील कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर तालुक्यातील प्रमुख शासकीय रुग्णालय असल्याने या रुग्णालयात येणाऱ्या सामान्य रुग्णांसह अन्य आकस्मिक रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यात देखील कर्तव्य दक्ष असताना संबंधितांचे तब्बल तीन महिन्यांपासून पगार देण्यात नाही. सदर पगार न झाल्याने संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना व कुटुंबीयांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असून उपासमारीचे संकट ओढावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन कोरोनाकाळात महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होण्यासाठी आवश्यक कार्यवाही व उपाययोजना करण्याची मागणी आहे.