भंडारा : कोरोनाच्या कराल दाढेत जिल्ह्यातील ५०७ बालकांचे पालक हिरावले तर पाच बालकांच्या आई-वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने ते निराधार झाले आहेत. अशा बालकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहणार असून, केंद्र आणि राज्य शासन त्यांचे पालकत्व स्वीकारणार आहे. महिला व बालविकास विभागाने अशा मुलांचा शोध घेतला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला. काही बालकांचे वडील, तर काही बालकांची आई या कोरोनाने हिरावून नेली. जिल्ह्यात वडील गमावलेल्या बालकांची संख्या ४५२ आहे. तर ५० जणांची आई कोरोनाची बळी ठरली. ५०२ बालकांचे पालकत्व कोरोनाने हिरावून नेले आहे, तर जिल्ह्यात पाच बालक असे आहेत ज्यांचे आई आणि वडीलही या कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. निराधार झालेल्या या बालकांच्या संगोपनासाठी आता शासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ही बालके आढळून आली आहेत.
केंद्र सरकारनेही या बालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे तसेच राज्य शासनही त्यांना मदतीचा हात देणार आहे. तूर्तास जिल्हास्तरावर आदेश प्राप्त झाले नसले तरी महिला व बालविकास विभागाच्या योजनेंतर्गत त्यांना मदत केली जात आहे. या योजनेतून ११०० रुपयांची मदत दिली जाईल. शून्य ते दहा वर्षांपर्यंतच्या बालकांना ही मदत मिळणार आहे.
कोट
कोरोनाने पालक गमावलेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत पाच बालक असे आढळले की ज्यांचे आई-वडील कोरोनाने मृत्युमुखी पडले, तर ५०२ बालकांपैकी कुणाचे वडील तर कुणाची आई कोरोनाने मृत्युमुखी पडली. महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातर्फे त्यांना सर्व शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दोन्ही पालकांचे छत्र हरविलेली बालके कुटुंबात किंवा नातलगांकडे सुरक्षित आहेत. अशा बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येईल.
-विजय नंदागवळी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी