भंडारा : जिल्ह्यातील धान खरेदीतला भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. अवघ्या सहा तासात झालेल्या सहा लाख क्विंटल धान खरेदी प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात येईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांबरोबरची बेईमानी आमचं सरकार सहन करणार नाही. कायम शेतकरी हिताचे निर्णय घेईल, असंही फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. जिल्ह्यात आधारभूत खरेदी केंद्रावर एका दिवशी अवघ्या सहा तासात सहा लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली. या विक्रमी धान मोठ्या प्रमाणत गैरप्रकार झाला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकरी समजून धानाची विक्री करू नये, म्हणून धान खरेदी संदर्भात योग्य चौकशी करू असे ते म्हणाले. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार नव्याने सत्तारुढ झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले असून यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.
यावर्षी धानाला बोनस देण्यासंदर्भात नियोजन करणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर येथे पर्यटन विकासाला चालना देणार आहोत. रोजगार निर्माण करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांचं धान खरेदी झालचं पाहिजे. जनहितासाठी निधी कमी होऊ देणार नाही, प्रलंबित कामं तातडीने मार्गी लावणार, असं आश्वासनही त्यांनी दिलं. जिल्हा पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून जिल्ह्यातील विकासाची कामे मार्गी लावू, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी लोकप्रतिनिधींना कामांसंदर्भात सुनावलं. लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक आहे. पण एकदा लोकांनी निवडून दिलं की, लोकप्रतिनिधी स्वत:ला मालक समजतात. जनता आपली मालक आहे. त्यांच्या प्रश्नांना समजून घेत त्या दृष्टीने उपाययोजनाकरा, अशी तंबी फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींना दिली. तसेच, संबंधित कामाचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडा, असेही स्पष्ट केले. यावेळी खासदार सुनील मेंढे यांच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या दुपट्ट्याची चर्चा भाजप कार्यकर्ता मेळ्याव्यात उपस्थित शिंदे गटात सहभागी अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या गळ्यातील भाजपचा दुपट्टा चर्चेचा विषय झाला होता. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह खासदार सुनील मेंढे उपस्थित होते. यावेळी स्वागत करताना आमदार भोंडेकर यांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा घालण्यात आला होता.