लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : भंडारा शहरात शासनाच्या अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत ई-लायब्ररी, तसेच शहरातीलच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात झालेल्या कामांमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी शासन प्रशासनाला करण्यात आल्या. परंतु वर्ष उलटूनही त्यावर कुठलीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केला आहे.
भंडारा शहरातील नाशिकनगर, वैशालीनगर, संत रविदास मंदिर, कपिलगर येथील बौद्ध विहारामध्ये डिजिटल लायब्ररीचे जे काम झाल्याचे दाखविण्यात आले आहे, ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असून अंदाजपत्रकानुसार नाही. याचसोबत शहरातील एकमेव मैदान असलेले छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील जलतरण केंद्र, बास्केटबॉल ग्राऊंड, ऑफिस व होस्टेलच्या दुरुस्तीच्या कामात घोळ आहे. येत्या पंधरा दिवसांत या दोन्ही कामांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांना निलंबित न केल्यास उद्धवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात उभी असेल, याची जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना उद्धवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, विधानसभा प्रमुख नरेंद्र पहाडे, तालुकाप्रमुख ललित बोंद्रे, शहरप्रमुख आशिक चुटे, सुधीर उरकुडे, राकेश आग्रे, हर्षल टेंभूरकर, प्रवीण पवळे, गुरुदेव साकुरे, आशिष गणवीर, ज्ञानेश्वर मते, जयेश रामटेके, सूरज साठवणे आदी उपस्थित होते.