लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाच्या अवकृपेचा सामना करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांना यंदा तुडतुड्याने उध्वस्त केले आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी अवस्था झाली आहे. मशागत, बियाणे, रोवणी, फवारणी, कापणी, बांधणी, मळणी यावर साधारण २२ हजार रुपये खर्च होतो. २० ते २५ क्विंटल धानाचे उत्पादक अपेक्षित असते. मात्र यंदा निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांना एकरी ७ ते १० क्विंटल धानाचा उतारा येत आहे. एक क्विंटल धान उत्पादनासाठी सरासरी २५०० रुपये खर्च येतो. मात्र शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरत नाही. धानाचे हमीभाव १८६८ रुपये आहे. शेतकऱ्यांना गत काही वर्षांपासून बोनस मिळत असल्याने थोडा दिलासा मिळतो. यंदाही धानाला ७०० रुपये बोनस मिळण्याची आशा आहे. जिल्ह्यात आधारभूत धान खरेदीला प्रारंभ झाला आहे. शेतकरी धान विक्रीसाठी आधारभूत केंद्रावर येत आहे. मात्र गत काही वर्षाचा अनुभव पाहता यंदाही शेतकऱ्यांना घाटाच सहन करावा लागत आहे.
बोनसची प्रतीक्षाधान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळत असल्याने कशीतरी खर्चाची तजवीज होते. यंदा ७०० रुपये बोनसच्या घोषणेची प्रतीक्षा आहे.
उत्पादन खर्च भरमसाठगत काही दिवसात मजुरीच्या खर्चासह बियाणे, कीटकनाशक आणि खतांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. एकरी साधारणत: २२ हजार रुपये खर्च होत आहे. मशागतीसाठी सात हजार, बियाणे दोन हजार, कीटकनाशक व रासायनिक खतासाठी पाच हजार कापणी व बांधणीसाठी ३५००, मळणीसाठी २५०० रुपये व इतर खर्च येतो.
कीटकनाशक किमती
गत काही वर्षांपासून सर्वसाधारण प्रतीच्या धानावर कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. यंदा तुडतुड्याने शेतकऱ्यांना उध्दवस्त केले. तुडतुडा नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना साधारणत: एकरी तीन ते पाच हजार रुपये खर्च आल्याचे सांगत आहे.
वातावरणातील बदलाने धान पीक सुरूवातीपासूनच कीडीच्या अधिन झाले. गादमाशीचा त्रास वाढल्याने नियंत्रणाचा खर्च मोठा झाला. गर्भावस्थेत धान असताना तुडतुडा आला. एकदा नव्हे पाचदा कीटकनाशकांची फवारणी करूनही उपयोग झाला नाही. गतीवर्षीपेक्षा यंदा निम्मे उत्पन्नही होते की नाही, अशी शंका आहे. - आनंदराव हटवारशेतकरी
उत्पादन खर्च व हाती येणारे उत्पन्न यात बरीच तफावत यंदा जाणवणार आहे. खताच्या कीटकनाशकाच्या व मजुरीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तुलनेत गतवर्षीपेक्षा हमीभावात केवळ ५३ रुपयेच वाढ झाली. १८३८ रुपये हमीभाव मिळत आहे. आता धानाची शेती तोट्याची झाली असून सरकारने यावर विचार करणे गरजेचे आहे. तरच शेतकरी तरेल.- प्रशांत खागरशेतकरी