०७ लोक १३ के
पालांदूर : गाव गावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, लावा ग्रामोन्नतीचा दिवा, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रगतीचा मूलमंत्र ‘ग्रामगीते’तून आपल्याला दिलेला आहे. गाव समृद्ध झाल्याशिवाय देश आत्मनिर्भर होणार नाही. तेव्हा तरुणांनो शहराकडे धाव न घेता आपल्याच गावात तंत्रज्ञानाचा आधार घेत रोजगार तयार करा. एकमेकाला सहकार्य करीत गावाला समृद्ध बनवा, अशी मार्मिक विचारांची पेरणी राष्ट्रसंत तुकडोजींच्या ग्रामगीतेचा आधार घेत पालांदूरवासीयांना भागवत सप्ताहातून हभप जगदीश्वर बांगरे महाराज पळसगाव (कोलारी) यांनी प्रबोधन केले.
महाराज म्हणाले, घराघरातून राष्ट्रसंतांची शिकवण कलयुगात तारक ठरलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी यांनी तुम्हा-आम्हाकरिता सोप्या भाषेत ग्रामगीता लिहिलेली आहे. तिचे वाचन प्रत्येकांनी करीत गावाला समृद्ध करण्याकरिता प्रत्येकाचे सहकार्य अपेक्षित सांगितलेले आहे. निर्व्यसनी राहत दिव्य आयुष्य जगण्याची कला ग्रामगीता तुम्हाला सांगत आहे. प्रत्येक तरुणाने मातापित्यांची सेवा करीत कुटुंबाला सक्षम करण्याकरिता गावातच उद्योगशील बनावे. आपल्या काळ्या मातीतच समृद्धी आणीत आपलं गाव प्रगतिपथावर नेण्याकरिता तरुणांनी पुढाकार घ्यावा. सुसंस्कृत कुटुंब, गाव, देश घडविण्याकडे कल असावा. उपाशी व्यक्तीला अन्न, तहानलेल्याला पाणी, भरकटलेला रस्ता दाखवीत आयुष्यात एकमेकाला सहकार्य करावे. यातच खरा ईश्वर असल्याचे राष्ट्रसंतांनी सांगितलेले आहे. प्रत्येकाने राष्ट्रसंतांची वाणी खरी ठरविण्याकरिता प्रामाणिक तेने प्रयत्नशील असावे, असे आवाहन बांगरे महाराज यांनी केले.
चौकट
बांगरे महाराज यांनी सातही दिवस सकाळी अर्धा तास रामधून निघण्यापूर्वी गावकऱ्यांना ग्रामगीतेचे महत्त्व समजावून सांगितलेले आहे. ग्रामगीतेतील तुकडोजींच्या विचारांची पेरणी करीत भागवत सप्ताहाला तुकडोजीमय केले आहे. आधुनिक काळातही ग्रामगीतेचे महत्त्व अबाधित आहे. गाव हा देशाच्या नकाशावरील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.