मोहाडी तालुक्याच्या ताडगाव येथील आचल ९ मे रोजी घरून कोणालाही न सांगता निघून गेल्याची तक्रार आंधळगाव पोलिसांत देण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला. ठाणेदार मटामी यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार विजय मोदनकर, प्रशांत वैरागडे शोध घेतला. त्यावेळी त्याच गावातला राम अशोक मते याच्यासोबत गेली असल्याचे पुढे आले. आचलला ११ मे रोजी पोलीस ठाण्यात बोलावून आचलचा बयाण नोंदविला. तिच्या नातेवाइकांना बोलावून माहिती दिली. पण नातेवाईक तिला घरी नेण्यास तयार नव्हते. तिचा प्रियकर राम मते यास पोलीस ठाण्यात बोलावून विचारपूस केली. त्याने प्रेमाची कबुली दिली. स्वमर्जीने एकमेकांसोबत लग्न करण्यास तयार आहोत, असे सांगत माझ्या घरच्यांचा विरोध असल्याचे सांगितले. त्यावेळी ठाणेदार मटामी यांनी दोन्ही कुटुंबांतील लोकांना बोलावून समजावून सांगितले. परंतु दोघांचेही नातेवाईक लग्नासाठी तयार नव्हते. अखेर ठाणेदारांनी पुढाकार घेत त्यांचे लग्न लावून दिले. दोन प्रेमीजिवांना एकत्र आणले. यावेळी फौजदार विजय मोदणकर, प्रशांत वैरागडे, महिला दक्षता समिती सदस्या रीना निनावे, उषा धार्मिक, प्रीती निनावे, शांतता समिती सदस्य रामरतन खोकले, मनोहर बुराडे उपस्थित होते. पोलिसांच्या मदतीने त्या युवकाला वाहनचालकाची नोकरी व राहण्यासाठी भाड्याची खोली सुद्धा पाहून दिली. आता या अनोख्या विवाह सोहळ्याची परिसरात चर्चा असून, पोलिसांचेही कौतुक होत आहे.
पोलिसांच्या मदतीने प्रेमीयुगुल विवाह बंधनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:34 AM