इंद्रपालक कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना महामारीत त्रिसूत्रीचे पालन काटेकोरपणे केल्याने कोरोना मुक्तीकडे जिल्ह्याची वाटचाल झाली आहे. मात्र कोरोना काळात रुग्णांसाठी आधारवड ठरलेले कोविड सेंटर मोकाट कुत्र्यांचे आश्रयस्थान बनले आहे. भंडारा येथील ऐतिहासिक शाळा असलेल्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील हा प्रकार जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. कोविड सेंटरसाठी शाळेची इमारत अखत्यारीत घेतल्यानंतर वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी घेण्यात न आल्याने आता मानवीय आरोग्यालाच धोका उत्पन्न झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. जिल्हा रुग्णालयासह कोविड केअर सेंटर तसेच खासगी कोविड रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाली. क्षमतेपेक्षा जास्त रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाने मोठ्या शाळांमधील वर्गखोल्या कोविड केअर सेंटरसाठी निवडल्या. यात भंडारा शहरातील लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील ज्युनिअर कॉलेज सेक्सनमधील १२ वर्गखोल्या रुग्णांसाठी वापरण्यात आल्या. येथे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पलंग, गाद्या, चादर व अन्य साहित्य आणून ठेवले. हळूहळू रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर कोविड सेंटर ओसाड होत गेले. मात्र स्वच्छतेची कुणीही जबाबदारी घेतली नाही. वर्गखोल्यांबाहेर कोविडचा कचरा गोळा करण्यात आला होता. मात्र दोन महिन्यांपासून त्याची उचल करण्यात आली नाही. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच वर्गखोल्यांबाहेरील कचरा उचलण्यात आला. मात्र वर्गखोल्यांमधील कचरा आजही तसाच पडून आहे. खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धूळ साचली असून या वर्गखोल्यात आता मोकाट कुत्रे आश्रित आहेत.
आरोग्य साहित्याची किंमत शून्य- जनतेच्या करातून गोळा झालेल्या पैशांतूनच आरोग्य विभागाला साधन सामुग्री मिळत असते. कोविड सेंटर असलेल्या शास्त्री विद्यालयात आरोग्य विभागामार्फत येथे आरोग्य साहित्य आणण्यात आले. मात्र या साहित्यांची आता कुठलीही किंमत राहिली नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. पलंग, गाद्या, चादर व अन्य साहित्य धूळखात असल्याने त्याची किंमत प्रशासनाच्या नजरेत कवडीमोल आहे असेच वाटते.
आरोग्याला धोका - कोविड सेंटर असल्यामुळे साधारणत: इथे कुणीही फिरकत नाही. आधीच उघड्यावरच कोविडचा कचरा फेकण्यात आल्यानंतर परिसरातील वातावरण अस्वच्छ झाले होते. आरोग्य विभागही स्वच्छतेकडे कानाडोळा करीत होते. याबाबत शाळा व्यवस्थापन प्रशासनाने स्वच्छतेसाठी प्रशासनाला पत्रव्यवहारही केला होता. मात्र याचीही दखल घेण्यात आली नाही. एका आजारातून अन्य आजारांचा संसर्ग व उद्रेक होत असताना मानवीय आरोग्याची काळजी कुणालाच नाही का, असा प्रश्नही यानिमित्ताने उत्पन्न होत आहे.