भंडारा : कोरोनाचा जिल्ह्यात प्रादुर्भाव पाहता लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविली जात असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस हाच एकमेव उपाय आहे. लस घेतलेल्या फ्रंटलाईन वर्करमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण ०.०४ टक्के एवढे नाममात्र असून, मृत्यूचे प्रमाण जवळजवळ शून्य टक्के आहे. जिल्ह्यातील ज्या पात्र नागरिकांनी लस घेतली नाही, त्यांनी लस अवश्य घ्यावी व स्वतःला सुरक्षित करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.
लस घेतल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होतो, असा गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरला आहे. विशेषतः ग्रामीण भागात नागरिक लस न घेण्याचे कारण संसर्ग होण्याची भीती सांगतात. ही बाब पूर्णतः चुकीची आहे. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू असून, ही लाट पहिल्यापेक्षा जास्त धोकादायक आहे. पहिल्या लाटेच्या वेळी लस नव्हती, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक होते. आता मात्र लस आली असून, लस घेतलेल्या कुठल्याही नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील १५० पोलीस अधिकारी, कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. फ्रंटलाईन वर्कर म्हणून प्राधान्याने लसीकरण केल्यानंतर आता आलेली दुसरी लाट तीव्र असतानासुद्धा एकही पोलीस गंभीर श्रेणीत नाही किंवा मृत्यू झाला नाही. याला एकमेव कारण लसीकरण असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मागील वेळी राज्यात अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची संख्या वाढली होती. मात्र, यावेळी ज्यांनी लस घेतली, अशा एकही अधिकारी, कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला नाही.
ही बाब लक्षात घेता नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे. लसीकरणानंतरही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. मात्र, लसीचे 'कवच कुंडले' ज्यांच्याकडे आहेत, त्यांना अजिबात धोका होणार नाही हेही तेवढेच खरे आहे. लस ही अत्यंत सुरक्षित असून, लसीकरणाने आपले जीवन सुरक्षित होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
लसीकरण
भंडारा जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोविड लसीकरणास सुरुवात झालेली असून, आजपर्यंत १६१५८१ लोकांना प्रथम डोस व २६१४० लोकांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे. त्यापैकी प्रथमत: कोविड़ आजाराशी लढा देणाऱ्या १०१४८ हेल्थ केअर वर्कर यांना प्रथम डोस देण्यात आलेला असून, दुसरा डोस ६४८४ हेल्थ केअर वर्कर्सना देण्यात आलेला आहे. तसेच ८९७४ फ्रंटलाईन वर्कर यांना प्रथम डोस देण्यात आलेला असून, ४६७२ फ्रंटलाईन वर्करना दुसरा डोस देण्यात आलेला आहे. ४५ वर्षांवरील १,४२,४५९ लोकांना प्रथम डोस देण्यात आलेला असून, १४९८४ लोकांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे.