गत काही महिन्यांपूर्वीपासून लाखांदूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात लाखांदूर येथे मोफत पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर घेतले जात आहे. या शिबिराला तालुक्यातील शेकडो विद्यार्थी, युवकांचा प्रचंड प्रतिसाददेखील लाभत आहे. या शिबिराअंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थी युवकांच्या विविध विषयांतर्गत चाचणी सराव परीक्षादेखील घेण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी या मोफत प्रशिक्षण शिबिराअंतर्गत तालुक्यातील विद्यार्थी युवकांमध्ये प्रचंड उत्साहदेखील दिसून येत आहे. मात्र, या शिबिराचे आयोजक व मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम यांची बदली करण्यात आल्याच्या माहितीने प्रशिक्षण शिबिराच्या लोकोपयोगी व समाजोपयोगी कार्याला तडा जाण्याची भीती असून तालुक्यातील प्रशिक्षणार्थी युवकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.
याप्रकरणी पोलीस प्रशासनातील वरिष्ठांनी ग्रामीण भागातील युवकांना उपलब्ध होणाऱ्या मोफत प्रशिक्षण शिबिराचा लाभ होण्यासाठी या लोकोपयोगी कार्याच्या समर्थनार्थ आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी तालुक्यातील शेकडो प्रशिक्षणार्थी युवकांसह जनतेतून केली जात आहे.