चुल्हाड (सिहोरा) : क्रीडा सत्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार करण्याची गरज आहे. यासाठी खेळाचे निरंतर प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हास्तरावर नियोजन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्यावतीने जिल्हास्तरीय क्रीडा सत्राचे आयोजन चुल्हाड येथे करण्यात आले आहे. या क्रीडासत्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. क्रीडासत्राचे उद्घाटन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी खासदार नाना पटोले होते. यावेळी मंचावर आमदार चरण वाघमारे, आमदार अॅड.रामचंद्र अवसरे, माजी खासदार शिशुपाल पटले, जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश पारधी, संदीप ताले, अरविंद भालाधरे, उपसभापती वासुदेव वाडीभस्मे, उपेश बांते, जिल्हा परिषद सदस्य राजेश पटले, आशा कोकुडे, भरत खंडाईत, उल्हास बुराडे, बाबु ठवकर, अशोक उईके, हरेंद्र राहांगडाले, सुरेश राहांगडाले, अजय खंगार, अशोक पटले, सरपंच रेखा सोनवाने, उपसरपंच कंठीलाल ठाकरे, हिरालाल नागपुरे, बंटी बानेवार, कार्याध्यक्ष स्वर्णलता घोडेस्वार, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार उपस्थित होते.यावेळी ना. बावनकुळे म्हणाले, क्रीडा सत्रात विद्यार्थ्यांच्या मनात ऊर्जा निर्मिती होते. त्यांच्यात असलेल्या सुप्तगुणांना वाव मिळतो. विदर्भातुन नावलौकिक करणारे खेळाडू घडविण्यावर भर दिला पाहिजे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. यावेळी ना.आत्राम म्हणाले, जिल्ह्यातील ८० हजार आदिवासी बांधवाच्या विकासाकरिता अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येणार असून खावटी कर्ज वाटपासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. प्रारंभी विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन ना. बावनकुळे यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यातून नैनलाल पटले या शिक्षकानी राज्यात विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक पटकाविल्याची माहिती कार्याध्यक्ष स्वर्णलता घोडेस्वार यांनी दिली. या क्रीडासत्रात चुल्हाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी भक्ती गीतावर नृत्य सादर केले. क्रीडासत्रात जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात आलेल्या शालेय उपक्रमाची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश पारधी यांनी दिली. क्रीडासत्राचे संचालन आदेश बाम्बोर्डे, मंजुषा बोदेले यांनी केले. (वार्ताहर)
ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करा
By admin | Published: February 07, 2015 12:17 AM