वाकेश्वर : अलीकडच्या काळात निसर्ग बदलत चालला आहे. ऋतुचक्र बदलत चालल्याने वातावरण, हवामान, पर्यावरण बदलावर परिणाम होत आहे. आज कोरोनामुळे सर्वांचीच ऑक्सिजनसाठी धावपळ सुरू आहे. या जागतिक कोरोना महामारीने माणूस पुरता घायाळ झाला आहे. हे कोणामुळे घडतंय आणि का घडतंय, याला जबाबदार कोण याचा प्रत्येकाने विचार करणे खूप गरजेचे झाले आहे. अनेक ठिकाणी डॉक्टरसुद्धा आपल्या औषधांच्या चिठ्ठीवर झाडे लावा, झाडे जगवा, ऑक्सिजन वाढवा असा सल्ला देत आहेत.
राज्यातील वृक्ष अच्छादन क्षेत्र वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना अमलात आणली. १३ कोटी वृक्ष लागवडीची घोषणा शासनाने केली होती. पण लावलेली नेमकी किती रोपे जगली याची नोंद शासनाकडे आजही नाही. डंका पिटून वृक्ष लागवड करण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीला वृक्षाचे महत्त्व पटवून देऊन शासनाने वृक्षाचे जतन व संगोपन करणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्री - पुरुष, आबालवृद्ध, लहान-मोठे शाळकरी मुले, मुली प्रत्येकाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाने आता बिगरसरकारी संस्था, वृक्षप्रेमी संघटना व गावागावातील सामान्य जनतेचा सहभाग घेऊन वृक्षलागवड योजना ही लोकचळवळ म्हणून उभी करायला पाहिजे, तरच भविष्यातील ऑक्सिजनचे संकट टाळता येणार आहे. सध्या कोरोना संकटात सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व कळाले आहे. जो तो ऑक्सिजनवर बोलताना दिसून येत आहे. तसेच ऑक्सिजन वाढविण्यासाठी प्रत्येकाची धडपड आहे. ऑक्सिजनची कमतरता अनेक रुग्णांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. पृथ्वीवर औषधांचा व ऑक्सिजनचे एकमेव स्त्रोत म्हणजे झाडे असतात. मानवावर आलेल्या या कोरोना संकटामुळे आज सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व कळू लागले असून, भविष्यात चांगल्या ऑक्सिजसाठी वृक्षारोपण चळवळ उभारण्याची गरज आहे.
मानव प्राणी तसेच पर्यावरणासाठी वरदान असणारे पिंपळाचे झाड दिवसातून २४ तास ऑक्सिजन देतो. तथागत गौतम बुद्धांनी याच वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती केली होती आणि म्हणूनच या वृक्षाला बोधिवृक्ष असेही म्हणतात. या झाडांची पाने औषधी गुणांनी युक्त आहेत. जास्त ऑक्सिजन सोडणाऱ्या झाडांमध्ये अशोक वृक्षाचाही समावेश आहे. यासोबतच वडाच्या झाडाचेसुद्धा खूप महत्त्व आहे. या झाडाला अक्षयवृक्ष म्हटले जात असते. भविष्यात नैसर्गिक ऑक्सिजनला कायम ठेवायचे असेल तर वृक्षारोपण करण्यासोबतच त्याचे संगोपन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. ही वृक्ष लागवड लोकचळवळ बनेल तेव्हाच आजूबाजूचा संपूर्ण परिसर हिरवागार दिसेल. मुबलक जीवसृष्टी अनुभवायला मिळेल. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक जिवांना निसर्ग दीर्घायुष्य देत असतो.
बॉक्स
एका झाडाचेही आहे अमूल्य योगदान
एक झाड पन्नास वर्षात ३५ लाख रुपये किमतीचे वायुप्रदूषण टाळते. एक झाड १५ लाख रुपये किमतीचे ऑक्सिजन उत्पादित करते. एक झाड एक वर्षात तीन किलो कार्बन-डायऑक्साइड नाश करते. एका झाडावर १०० पक्षी घरटे बांधून राहू शकतात. त्याच्यावर त्याच्या पंचवीस पिढ्या जन्माला येतात आणि मधमाशांचे पोळे झाडावर असल्यास ती संख्या लाखांवर जाते. एक झाड आपल्या पालापाचोळाची भर टाकून जमिनीची कस वाढवते. एक झाड फळ, फूल, बिया आपल्यासाठी देतो. आतातरी वृक्षलागवड करणे आवश्यक झाली आहे. अन्यथा येणारी पिढी आपल्या पाठीवर ऑक्सिजनचे सिलिंडर लावलेली आपल्याला पहायला मिळेल. तासभर ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो, तर आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची आज पूजा करून त्याचे संवर्धन करणे गरजेचे झाले आहे. सगळ्यांनी झाडे लावून निसर्गावर प्रेम करणे काळाची गरज बनली आहे. कारण येणाऱ्या काळात निसर्गच आपल्याला जगविणार आहे.
कोट
आम्ही श्रावस्ती सामाजिक संस्थान रावणवाडीच्या माध्यमाने यावर्षी ५० बोधिवृक्षांची झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. जुलै महिन्यात या बोधिवृक्ष लागवडीला प्रारंभ करणार आहोत. निव्वळ झाडेच लावणार नाही तर त्याचे जतन, संगोपनाचाही संकल्प केला आहे. वृक्षांची कोरोनाकाळात खरी गरज जाणवत आहे.
अरुण गोंडाणे, अध्यक्ष, श्रावस्ती सामाजिक संस्थान, रावणवाडी