भंडारा : कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या नावांची यादी सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी येथील आरोग्य सेविकेसह तिच्या मुलावर भंडारा पोलीस ठाण्यात गुरुवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यादी दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.
भंडारा जिल्ह्यातील गराडा बु. येथील एक महिला कोरोना बाधित असल्याचे सोमवारी पुढे आले. प्रशासनाने सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी तयार केली. ही यादी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी 28 एप्रिल रोजी रात्री टीएचअो ग्रुपवर प्रसारित केली. संबंधित व्यक्तींचा शोध घेता यावा यासाठी ही यादी त्यांनी या ग्रुप वर टाकली होती. मात्र दुसर्या दिवशी सदर आरोग्य सेविकेने ही यादी आपल्या मुलाच्या व्हाट्सअपवर फॉरवर्ड केली. सदर मुलाने ही यादी इतर ग्रुपवर फॉरवर्ड केली. दोन दिवसात ही यादी संपूर्ण जिल्हाभर व्हायरल झाली. यादीत नावे असलेल्या व्यक्तींची नावे उघड झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान ही यादी कुणी व्हायरल केली याचा शोध सुरू झाला. तेव्हा भंडारा तालुका आरोग्य विभागातील आरोग्य सेविकेने यादी व्हायरल केल्याचे पुढे आले. गुरुवारी सायंकाळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे यांनी भंडारा ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून सदर आरोग्य सेविका आणि तिच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.