लाखनी (भंडारा) : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचे लग्न लावणे आई-वडिलांसह नातेवाईकांना चांगलेच महागात पडले. ग्रामसेवकाने दिलेल्या तक्रारीवरून पती, मुलीचे आई-वडील, सासू-सासऱ्यांसह नातेवाईकांवर रविवारी सायंकाळी लाखनी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलगी १७ वर्षे तीन महिने पाच दिवसांची आहे. तिचा विवाह काही महिन्यांपूर्वी करण्यात आला. मात्र, हा प्रकार गावातील ग्रामसेवकाच्या लक्षात आला. त्यांनी रविवारी सायंकाळी या प्रकरणी लाखनी ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून लाखनी पोलिसांनी पती, मुलीचे आई - वडील, सासू-सासऱ्यांसह नातेवाईकांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा व पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गौरी उईके करीत आहेत.