यंदाच्या उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्यात जवळपास ६९५९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे; तर काही क्षेत्रांत भाजीपाला, मूग, ऊस यांसह अन्य पिकांची लागवड करण्यात आली आहे. दरम्यान, कृषी वीजपंप व इटियाडोह धरण लाभक्षेत्रांतर्गत तालुक्यात कृषी सिंचन सुविधा उपलब्ध होत असून तालुक्यात उन्हाळी धानाची रोवणी संपुष्टात आली आहे.
दरम्यान, रोवणी पूर्ण होताच शेतकऱ्यांनी लागवडीखालील धान पिकावर रासायनिक खतासह अन्य कीटकनाशकांची फवारणीही केली आहे. मात्र गत काही दिवसांपासून तालुक्यात अनियमितपणे ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पावसाच्या भीतीने लागवडीखालील धान पिकावर खोडकिडा व करपा या किडरोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गत खरिपात तालुक्यात तीनदा पूरपरिस्थिती, तुडतुडा कीडरोग व परतीच्या पावसाने थैमान घातल्याने तालुक्यात शेतपिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पादनात घट झाली आहे.
या सबंध परिस्थितीवर मात करण्यासाठी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी तालुक्यात उन्हाळी धानाची लागवड केली. मात्र अंतराअंतराने तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने लागवडीखालील पिकांवर संभाव्य कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.