जिल्ह्यातील एक लाख ८४ हजार १९० शेतकऱ्यांनी पिकाचा विमा भरला. ३१ कोटी ९३ लाख ५ हजार ५८ रुपये यासाठी विमा कंपनीकडे शेतकरी, राज्य शासन केंद्र सरकार यांनी ही रक्कम पीक संरक्षणासाठी कंपन्यांना दिली. त्या बदल्यात कंपन्यांनी ३९ हजार शेतकऱ्यांना केवळ ४ कोटी ८ लाख रुपये परत केले आहेत. २८ कोटी रुपये विमा कंपनीला यामध्ये फायदाच झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रत्येक पीकच गतवर्षीच्या खरीप हंगामात हातामधून गेले. धान सोयाबीन, तूर, मूग, उडीद या सर्व पिकांना नुकसानीचा फटका बसला. केलेला खर्चही शेतकऱ्यांना काढता आला नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात शेतकऱ्यांची पार निराशा झाली आहे. अनेक तालुक्यांमध्ये हजार शेतकऱ्यांनाही मदत मिळाली नाही. असे दुर्दैवी चित्र आहे. नुकसानीच्या या महाप्रकोपात शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांनाच मदत झाल्याने शेतकऱ्यांची पार निराशा झाली आहे.
बॉक्स
दीड लाख शेतकरी बाद
जिल्ह्यातील एक लाख ६७ हजार २१ शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला होता. नैसर्गिक आपत्तीत मदत मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना विमा मिळालाच नाही. कंपनीच्या यादीतून एक लाख ४४ हजार ८३३ शेतकरी बाद झाले आहेत. नैसर्गिक संकटात मदत पुरविण्याचे आश्वासन कंपन्यांनी दिले होते. याच ठोस आश्वासनावर शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला होता. प्रत्यक्षात विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एक लाख ४४ हजार शेतकरी बाद झाले आहेत. यामुळे दुहेरी फटका बसला आहे.
विमा न मिळाल्याने संताप
जिल्ह्यातील एक लाख १० हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यामधील एक लाख ८४ हजार ०२५ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी विम्याचे कवच निर्माण केले होते. विमा भरूनही मदत न मिळाल्याने नुकसानग्रस्त शेतकरी संकटाच्या खाईत कोसळले आहे. विम्याची रक्कम न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे.
विमा भरूनही भरपाई नाही
कोट
संपूर्ण वर्षभर निसर्ग प्रकोपाने शेतकरी गारद झाला आहे. अशा परिस्थितीत विमा कंपन्यांनी पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले होते. यातून शेतकरी बिनधास्त होते. प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्यानंतरही केवळ मोजकेच शेतकरी मदतीला पात्र ठरतात, ही फार मोठी शोकांतिका आहे. यामध्ये कंपन्यांचेच भले झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे.
- उमराव मस्के, शेतकरी
यावर्षी धानाचा दाणाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. पावसाने संपूर्ण पीक मातीमोल झाले. या परिस्थितीत एक लाख ८४ हजार १०९ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. यामधील ३९ हजार ३५७ शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. त्यातही कुठल्या सर्कलला किती मदत मिळाली, याची माहिती नाही. विमा भरलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ दोन टक्के शेतकऱ्यांना ही मदत मिळत आहे.
- बाबुराव भुते, शेतकरी
दरवर्षी शेतकरी मोठ्या आशेने विम्याची रक्कम भरतात. आपले पीक संरक्षित करण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड असते. यावर्षी संपूर्ण पीक नष्ट झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या हाती छदामही लागला नाही. हे मोठे दुर्दैव आहे. लोकप्रतिनिधी आणि त्यांची आंदोलने पोकळ होती, नुकसानीनंतरही कंपन्यांचेच भले झाल्याचे पहायला मिळत आहे.
- नरेश भुते
खरीप हंगाम
२०२०-२१ पीकविमा लागवड क्षेत्र ८४०२५
एकूण जमा रक्कम ४०८०००००