लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सातही तालुके मिळून ९९ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली होती. यात अतिवृष्टीमुळे २३ हजार २६० हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत. यात एकूण ५१९ गावांमधील शेतशिवाराचा समावेश असून त्यात ४९ हजार १९७ शेतकरी बाधित झाले आहेत.
खरीप हंगामांतर्गत शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन, तूर, कापूस व भाजीपाल्याचे लागवड केली होती. मात्र, १९ ते २९ जुलै या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामांतर्गत लागवड केलेल्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आदेशानंतर महसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण केले. यात भंडारा तालुक्यातील १२२, मोहाडी १०८, तुमसर ६, पवनी १२८, साकोली ४६, लाखनी २०, तर लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांचे सर्वेक्षण झाले आहे. यामध्ये एकंदरीत ९९ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. त्यापैकी २३,२६० हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे. भंडारा तालुक्यात २६१९, मोहाडी ४१८१, तुमसर २७,५१७, साकोली ५०४, लाखनी १३१ तर लाखांदूर तालुक्यात १५,६१० शेतकऱ्यांच्या समावेश आहे.
जिल्ह्यात बंद असलेले मार्गअतिवृष्टीमुळे भंडारा ते कारधा (लहान पूल), खमारी पूल, चितापूर ते धारगाव, खमारी ते मांडवी, पवनी तालुक्यातील विरली ते सोनेगाव, कोंढा ते सोमनाळा, गोलेवाडी ते डोंगरगाव, तुमसर तालुक्यातील टूमनी नाला, मोहाडी तालुक्यातील आंधळगाव ते आंधळगाव पेठ, साकोली तालुक्यातील आमगाव ते बांपेवाडा, सरांडी ते चिचगाव, वांगी ते खांबा, खांबा ते चिंगी, लाखांदूर तालुक्यातील किन्ही ते सरांडी बु. व मासळ ते विरली मार्ग बंद आहेत.