बीड : ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांचा संपूर्ण दिवस आता बँकेतच खर्च होत आहे. रविवारी बँका सुरू होत्या. विश्रांती, खरेदी टाळून लोक नोटा बदलून घेण्यासाठी बँकेच्या दारात रांगेत उभे होते.एटीएम बंद, बँकेत तोबा गर्दी, हजार-पाचशे रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या अशा बिकट परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांची पुरती कोंडी झाली आहे. दूधवाल्यापासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांच्याच व्यवहारावर परिणाम झालेला दिसून येत आहे. नोटा बदलण्यासाठी अवघी ४ हजार रुपयांची मर्यादा असल्याने सर्वसामान्यांपासून ते थेट धनदांडग्यांची मोठी अडचण झाली आहे. उधार उसनवारीवरच थोडे फार व्यवहार केले जात आहे.रविवारी पाचव्या दिवशी सकाळपासूनच शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकांमधून व्यवहार सुरू होते. नोटा बदलण्यासाठी व बँक व्यवहारासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी लांबच लांब रांगा असल्याचे पाहावयास मिळाले.कामगारांची त्रेधातिरपीटरविवारी हातावर पोट असणारे मजूर आठ दिवसांच्या रोजंदारीवर भाजीपाला, किराणा खरेदी करतात. मात्र, अनेकांना १०००, ५०० च्या नोटांमुळे मजुरी मिळाली नाही. काहींनी बँकेच्या रांगेत थांबून गाठीशी असलेली थोडीफार पुंजी काढण्याचा प्रयत्न केला. काहींचे काम झाले, बाकीच्यांचा मात्र गर्दीमुळे दिवस वाया गेला. बीड, नेकनूरच्या आठवडीबाजारात शुकशुकाटबीड शहरातील भाजीमंडई व नेकनूर येथे आठवडी बाजाराला जबर फटका बसला. हजार, पाचशे रुपयांच्या नोटा कोणीच स्वीकारण्यास तयार नव्हते. त्यामुळे केवळ चाळीस टक्केच व्यवहार होऊ शकले. त्यामुळे भाजीपाला, धान्य विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हातीच परतावे लागले. काही व्यापाऱ्यांची जुनी वसुली लांबली असून नव्याने साहित्य उधार दिले. सुट्या पैशांचे वांधे होते. पाचशे-हजार रूपयांची नोट पुढे करताच व्यापाऱ्यांच्या कपाळ्यावर आठ्या येत होत्या. त्यामुळे उलाढाल मंदावल्याचे पहावयास मिळाले.आॅनलाईन व्यवहारावर भररोख चलनाचा तुटवडा असल्यामुळे पैशाच्या देवाणघेवाणीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे आॅनलाईन व्यवहारावर व्यापारी, नागरिकांनी भर दिल्याचे मागील चार दिवसात दिसून येत आहे. अनेकांनी घराचे हप्ते, एलआयसी, वीजबिल, फोनबिल, डीश रिचार्ज, मोबाईल रिचार्ज यासाठी आॅनलाईन बँकिंगवर भर दिला आहे. काहींनी नेटबँकिंग सुरू करण्यासाठी बँकेत अर्जही देण्यास सुरूवात केली आहे. बँकेतील रांगा, नोटांची चणचण व वाया जाणारा वेळ यापासून मुक्तता मिळवण्यासाठी आॅनलाईन बँकिंगला प्राधान्य दिले जात असल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पाच तासांत कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार
By admin | Published: November 14, 2016 12:34 AM