नाना पटोले म्हणाले, ‘मी व्यवस्थित’ भंडारा : खासदार चषक जलतरण स्पर्धेचे उद्घाटन करीत असताना खासदार नाना पटोले यांना भोवळ आल्याचे वृत्त पसरताच त्यांच्या चाहत्यांनी भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलच्या परिसरात गर्दी केली होती. दरम्यान, माझी प्रकृती व्यवस्थित असून लवकरच रूग्णालयातून सुटी होणार असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. शिवणीबांध येथे विदर्भस्तरीय खासदार चषक जलतरण स्पर्धेचे झेंडा घेऊन उदघाटन करीत असतानाच खा.नाना पटोले यांना अचानक भोवळ आली होती. त्यांना आ.परिणय फुके, आ.बाळा काशीवार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुनिल फुंडे, डॉ.राजेश चांदवाणी यांनी भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलला १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने आणले. नाना पटोले यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे कळताच माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, धनंजय मोहोकर, मुकेश थानथराटे, रूबी चढ्ढा, निलकांत अवघाते यांच्यासह विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली. साकोली ते भंडारा या प्रवासादरम्यान सुनिल फुंडे यांनी डॉ.गोपाल व्यास यांना नाना पटोले यांच्या प्रकृतीबाबत कळवून यंत्रणा सज्ज करण्यासाठी सांगितले होते. तोपर्यंत डॉ. गोपाल व्यास यांनी हृदयविकारतज्ज्ञ डॉ. मनोज झंवर, डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रवीशेखर धकाते यांच्यासह शहरातील सर्व वैद्यकीय तज्ज्ञांना पाचारण केले होते. हृदयविकारतज्ज्ञ डॉ.मनोज झंवर यांनी आरोग्य तपासणी केली. त्यानंतर त्याच रूग्णवाहिकेने नाना पटोले यांना नागपूरला नेण्यात आले. या रूग्णवाहिकेत जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रवीशेखर धकाते, डॉ. चौधरी यांना सोबत पाठविण्यात आले. नाना पटोले हे शनिवारला भिलाई येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथून मध्यरात्री ते सुकळी येथे निवासस्थानी पोहोचले. काही वेळ झोप घेऊन ते रविवारला सकाळी शिवणीबांध येथे खासदारचषक स्पर्धेच्या उदघाटनासाठी आले होते. कमी झोप आणि अशक्तपणा यामुळे त्यांना भोवळ आली होती. सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
पटोलेंच्या चाहत्यांची रूग्णालयात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2017 1:50 AM